२१० रुग्णांची आरोग्य तपासणी; सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन”…
⚡बांदा ता.०३-: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांकडून स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विविध आजारांचे वेळीच निदान होत नाही. आरोग्याच्या समस्यांचे वेळीच निदान होऊन योग्य उपचार मिळणे आवश्यक आहे. निरोगी जीवनासाठी नियमित आरोग्य तपासणीला प्राधान्य दिले पाहिजे. बांदा मराठा समाज व बांदेश्वर आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबिर हा अत्यंत स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम आहे, असे प्रतिपादन बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले.
बांदा मराठा समाज व बांदेश्वर आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने याठिकाणी आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २१० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, माजी उपाध्यक्ष आनंद गवस, माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत, डॉ. संजय केसरे, डॉ. सौ. जयश्री केसरे, पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक, मुख्य प्रवर्तक गुरुनाथ सावंत, सुरेश परब, लोकमान्य बँकेचे व्यवस्थापक तुळशीदास गवस, बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, माजी अध्यक्ष बाळु सावंत, मंडळाचे सल्लागार दीपक सावंत, महिला मराठा समाज अध्यक्षा सौ. स्वाती सावंत, कास सरपंच प्रवीण पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे बांदा मराठा समाजाच्या पदाधिकारी व सदस्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी डॉक्टरांच्या रुग्णसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉक्टर हे केवळ रुग्णांवर उपचार करणारे नसून अनेकांना नवजीवन देण्याचे कार्य करतात. त्यामुळे डॉक्टरांचे कार्य देवदूतासमान आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आर्थिकदृष्ट्या व प्रवासाच्या दृष्टीने अडचणीचे ठरते. अशा परिस्थितीत बांदा मराठा समाजाने पुढाकार घेऊन आयोजित केलेले हे शिबिर पंचक्रोशीतील नागरिकांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये नेत्र तपासणीसह विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यामुळे गरजू रुग्णांना आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी माजी अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष विनोद सावळ, सचिव सीताराम गावडे, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, कार्यकारिणी सदस्य भूषण सावंत, लवू रेडकर, मिलिंद सावंत, श्यामसुंदर धुरी, सदस्या सौ. लक्ष्मी सावंत, सौ. ममता सावंत, सौ. अवंती पंडित, सौ. माधवी गाड, सौ. राखी कळंगुटकर, सौ. रीना मोरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी ज्ञानेश्वर सावंत, माजी उपाध्यक्ष बाबा गाड, मकरंद तोरसकर, माजी सचिव महादेव सावंत, संतोष सावंत, माजी सहसचिव राजेश सावंत, माजी खजिनदार राकेश परब, सागर सावंत, माजी सदस्य विक्रम कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सीताराम गावडे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. रीना मोरजकर यांनी केले, तर आभार सौ. माधवी गाड यांनी मानले.

