पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांच्या प्रयत्नांना यश; पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थेला प्राधान्य” ..
⚡बांदा ता.०३-: बांदा शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी पंचायत समिती सदस्य स्वनिधी व १५ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून एकूण १८ लाख ५० हजार रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. पंचायत समिती सदस्य सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या प्रयत्नांतून ही कामे मंजूर झाली असून, यामुळे बांदा शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अंतर्गत रस्त्यांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
या मंजूर कामांमध्ये बांदा जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी येथे वॉटर फिल्टर, वॉटर कुलर व पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २ लाख ५० हजार रुपये, बांदा नळयोजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी २ लाख रुपये तसेच निमजगा नळयोजनेसाठी १० एचपी पंप व वेल्डिंग मशीन खरेदीसाठी १ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय कांता मोर्ये घर ते गजानन मोर्ये घर या दरम्यान सांडपाणी नाल्याच्या बांधकामासाठी ५ लाख ५० हजार रुपये, बांदा शहरातील सार्वजनिक ठिकाणी ओला व सुका कचऱ्यासाठी डस्टबिन बसविण्यासाठी १ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बांदा गाळेल मुख्य रस्ता ते प्रमोद मावळणकर घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ४ लाख रुपये, तर रविंद्र हरमलकर घर ते दिलीप सावंत घरापर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी २ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या सातही कामांसाठी एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले आहे.
बांदा शहरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती सदस्य सौ. ऋतिका संदेश नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या निधीमुळे बांदा शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

