Headlines

कुडाळच्या आंबेडकरनगर, दत्तनगर-कविलकट्टा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

सात दिवसांत खड्डे बुजवा; अन्यथा ‘रस्ता रोको’चा इशारा

कुडाळ : कुडाळ-बाव मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR-27) वरील आंबेडकरनगर, दत्तनगर आणि कविलकट्टा परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या व जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज, २५ ऑगस्ट रोजी कुडाळ उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आला असून, रेल्वेने कुडाळमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढणार असल्याने या मार्गावरील वाहतूकही वाढणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली.
आंबेडकरनगर, दत्तनगर रोड आणि कविलकट्टा परिसरात रस्त्यावर मोठे व खोल खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून, दुचाकीस्वार, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
रस्त्यावरील खड्डे पुढील सात दिवसांत दर्जेदार पद्धतीने बुजवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या कालावधीत प्रशासनाने कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे.
या जीवघेण्या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. तसेच मागणीची दखल न घेतल्यास ‘थेट खड्ड्यात बसून’ आंदोलन आणि रस्ता रोको करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख अमर सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, नगरसेवक मंदार शिरसाठ, नगरसेवक संतोष शिरसाठ, सुशील चिंदरकर, नितीन सावंत, बाळा पावसकर, अमित राणे, भूषण कुडाळकर, गुरु गडकर, संजय मसुरकर, धीरेंद्र चव्हाण, अभियंता श्री. बामणे तसेच आंबेडकरनगर व कविलकट्टा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page