Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे अॅड. विवेक गोखले यांना श्रद्धांजली…

⚡वैभववाडी ता.२५-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने वैभववाडी येथील युवा वकील अॅड. विवेक गोखले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अॅड. गोखले यांचे वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.

त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात रेफरन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या वेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे, जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. परिमल नाईक व कार्यकारिणीचे पदाधिकारी, BCMG सदस्य अॅड. संग्राम देसाई, जिल्हा सरकारी वकील अॅड. संदीप राणे व त्यांचे सहकारी तसेच जिल्ह्यातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी अॅड. गोखले यांच्या कार्याचा आणि सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नाधवडे, ता. वैभववाडी येथील अॅड. विवेक गोखले यांनी रत्नागिरी येथे एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले होते. २०१६-१७ पासून त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. कणकवली व वैभववाडी येथील दिवाणी न्यायालयात ते वकिली व्यवसाय करत होते.

अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेने आणि मनमिळावू स्वभावाने त्यांनी न्याय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
वकिली व्यवसायासोबतच अॅड. गोखले हे उत्कृष्ट नाटककार, तबलापटू तसेच कीर्तनकार म्हणूनही परिचित होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिले. त्यांच्या आकस्मिक निधनाने सिंधुदुर्गच्या न्याय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अॅड. विवेक गोखले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वैभववाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page