सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा पुढाकार; प्रशिक्षणातून रोजगार निर्मितीचा संकल्प..
सावंतवाडी : समाजसेवा आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आता निराधार व हतबल महिलांना स्वावलंबी करण्यासाठी ‘व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला’ हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात या उपक्रमांतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षणांना सुरुवात झाली आहे.
निराधार महिलांना विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्याचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, संस्थेच्या सचिव समीरा खलील, शरदिनी बागवे, हेलन निबरे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव यांचे सहकार्य लाभत आहे.
या प्रशिक्षणात मेहंदी प्रशिक्षक साझिया पडवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहंदी काढण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यासोबतच विविध उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षणही महिलांना दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक साहित्य सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण आठ ते दहा दिवस चालणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना या कौशल्याच्या माध्यमातून रोजगार अथवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.
या उपक्रमाचे अंकुर निवारा केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. यावेळी महिला व बालविकास अधिकारी बापू शिंगारे, सिकंदर आढाव, कनिष्ठ लिपिक ऐश्वर्या कल्याणी, अधिपरिचारिका वेदिका सावंत, स्वयंपाकी तुलसीदास तावडे, कनिष्ठ काळजीवाहक जोशना रेडकर, सुरक्षा रक्षक ज्योती पालव आणि केअरटेकर निकिता कदम आदी उपस्थित होते.
निराधार महिलांच्या हाताला कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगाराची दिशा देण्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
