स्थानिकांवर अन्याय:भाजप-मनसेने केला पर्दाफाश:त्या ठेकेदाराला पाय ठेवू न देण्याचा इशारा
यादितून ठेकेदार निवड केल्याचे वीज वितरणचे म्हणणे
*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील मिटर रिडींगचे काम करणाऱ्या कामगारांचा ठेका स्थानिक ठेकेदारांना डावलून, एका कोल्हापूर येथील ठेकेदाराला दिला असल्याचा प्रकार येथील भाजप व मनसे पदाधिकाऱ्यानी आज उघडकीस आणला असून, याबाबत आक्रमक होत महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता ह्या ठेकेदारीत बदल केल्याने स्थानिक कामगारानी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार, ग्रामपंचायत चराठा सदस्य तथा भाजप पदाधिकारी अमित परब, मनसेचे परिवहन कामगार जिल्हाध्यक्ष राजू कासकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. गेली 15 ते 20 वर्षे प्रामाणिकपणे येथील स्थानिक कामगार मीटर रिडींग चे काम करत आहेत. कोरोनाकाळात देखील या कामगारांनी चांगली कामगिरी केली. या वीज वितरण कार्यालयात गेली अनेक वर्षे एकूण 40 कामगार मीटर रिडींग चे काम करत असून, कोरोना काळात 2 कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. तर सध्या 4 जण कोरोनाशी झुंज देत आहेत. मात्र यावेळी कॉन्ट्रॅक्ट येथील ठेकेदारांना डावलून कोल्हापूर येथील ठेकेदाराला दिला असल्याचा आरोप भाजप व मनसे पदाधिकाऱ्यांनी करत हा प्रकार उघडकीस आणला आहे. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्याना धारेवर धरले होते. यावेळी त्यांनी चुकीच्या पद्धतीने ठेका दिला जात असेल तर त्या ठेकेदाराला सावंतवाडीत येऊ देणार नाही, स्थानिकांना डावलून इतर ठेकेदार रिडींग साठी गावात आल्यास त्याला चोप देऊ असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या महिला कामगारांनी अधिकारी व ठेकेदाराच्या विरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना काळात केलेल्या कामाचा जो आपला सत्कार करण्यात आला तो फक्त दिखाऊगिरीसाठी होता का ? असा सवाल देखील महिला कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी प्रामाणिकपणे सेवा करून देखील आम्हाला डावलले गेल्यास आंदोलन करू, असा इशारा महिलांसह अन्य कामगारांनी दिला आहे. याबाबत सावंतवाडीचे उपकार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, कुडाळ डिव्हिजन कार्यालयाकडून ही ठेकेदारी निवडण्याचे काम केले जाते. काम करण्यासाठी इच्छुक ठेकेदारांच्या लिस्ट मधून ठेकेदाराची निवड करण्यात येते. त्यानुसारच कोल्हापूर येथील ठेकेदाराला मीटर रीडिंग चे काम करण्यासाठी ठेका देण्यात आला आहे. अशी माहिती दिली आहे.
