पर्यटकांकडून होणाऱ्या धोकादायक कृत्यांना आळा घालण्यासाठी बीडीओंकडून वन विभागाला पत्र, मायकल डिसोजा यांनी वेधले लक्ष..
⚡सावंतवाडी, ता. २२-:
आंबोली पर्यटनस्थळी सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वन विभागाने गस्त वाढवून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनी केली होती. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी वन विभागाच्या आंबोली परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. दरम्यान पावसाळ्यात आंबोली घाट परिसरातील धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी जिल्ह्यासह राज्य व परराज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र काही पर्यटकांकडून धोकादायक ठिकाणी उभे राहून छायाचित्रण करणे, सेल्फी घेणे, वाहनांची बेदरकार पार्किंग करणे तसेच मद्यप्राशन करून धिंगाणा घालण्याचे प्रकार घडत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारांमुळे आंबोलीची प्रतिमा मलिन होत असून स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी वन विभागाने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची गस्त वाढवून धोकादायक प्रकारांना आळा घालावा. आवश्यकतेनुसार पोलिस प्रशासनाची मदत घेऊन पर्यटकांवर नियंत्रण ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांच्या मागणीमुळे आगामी पावसाळी पर्यटन हंगामात आंबोली येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
