सुदैवाने अनर्थ टळला: पालिकेच्या दुर्लक्षावर समीर वंजारी आक्रमक..
⚡सावंतवाडी ता.२१-:
जुना बाजार येथील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे डॉ. उमेश मसुरकर हे घरातून बाहेर पडत असतानाच, अचानक त्यांच्या घरावर समोरील पिंपळ झाडाच्या भलेमोठ्या फांद्या कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा किंवा प्राणहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित धोकादायक झाडाची छाटणी करण्यात यावी, यासाठी सावंतवाडी नगरपालिकेकडे दोन वर्षांपूर्वीच रीतसर अर्ज करण्यात आला होता. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिकेकडून आजतागायत कोणतीही उपाययोजना किंवा कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप केला जात आहे. स्वयं डॉ. मसुरकर हे नगरपालिकेत कार्यरत असतानाही त्यांच्या बाबतीत अशी परिस्थिती ओढावत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुढील कोणताही अनर्थ किंवा दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ या झाडाची छाटणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. भविष्यात यामुळे कोणतीही हानी किंवा दुर्घटना घडल्यास त्यास पूर्णपणे सावंतवाडी नगरपालिकाच जबाबदार राहील, असा सडेतोड इशाराही समीर वंजारी यांनी दिला आहे.
