Headlines

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या पडझडीबाबत पुरातत्त्व विभाग व शासनाविरोधात मनसेची टीका…

⚡मालवण ता.२१-:
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी उभारलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आजही समुद्राच्या लाटांशी झुंज देत दिमाखात उभा आहे. मात्र नैसर्गिक आपत्ती आणि काळाच्या ओघात किल्ल्याच्या तटबंदीची होत असलेली पडझड रोखण्यासाठी पुरातत्त्व विभाग व शासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केला आहे.

किल्ल्याच्या विविध भागांची यापूर्वीही तटबंदीची पडझड झाली होती. मात्र पुरातत्त्व विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे आवश्यक ती दुरुस्ती वेळेत आणि प्रभावीपणे करण्यात आली नसल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचे गडकिल्ले पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाला नेमका कोणता अडथळा येत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याबाबत अनेक आमदार, मंत्री आणि पालकमंत्र्यांनी अधिवेशनात वारंवार आवाज उठवूनही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने संवर्धनाची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी वाईरकर यांनी केली.

सध्या पावसाळा सुरू असून अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत किल्ल्याच्या आणखी भागांची पडझड होऊन नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीच “महाराजांचे गडकिल्ले हीच त्यांची खरी स्मारके आहेत,” अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी शासन आणि पुरातत्त्व विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे वाईरकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर लवकरच राज ठाकरे यांची भेट घेऊन शासन व पुरातत्त्व विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही गणेश वाईरकर यांनी स्पष्ट केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम अग्रस्थानी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page