उपोषण, निवेदने… तरीही कारवाई नाही:नाईलाजास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडे केला राजीनामा सुपूर्द..
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराला विरोध करत तसेच प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक १२ (हिंदू कॉलनी)च्या नगरसेविका सौ. संध्या प्रसाद तेरसे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या राजीनामा पत्रात तेरसे यांनी नमूद केले आहे की, २ जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या कथित गैरकारभाराबाबत कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते. त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने १० जुलै रोजी उपोषण करण्यात आले. तसेच शहरातील सुमारे १०० नागरिकांच्या सह्यांसह कारवाईची मागणी करणारे निवेदनही सादर करण्यात आले. त्यानंतर १३ जुलै रोजी पुन्हा भेट घेऊन कारवाईची मागणी केली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशेष सभेमध्ये विषयपत्रिकेवरील विषयांवर ठराव मांडण्याची व मतदानाची मागणी करूनही सभाध्यक्षांकडून ठराव न घेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागातील नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनीसंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी सभेची मंजुरी न घेता परस्पर ना हरकत दाखला दिल्याचा गंभीर आरोपही तेरसे यांनी केला आहे. या प्रकरणात नगरपंचायतीच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ठरावही मंजूर करण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल मागवूनही मुख्याधिकाऱ्यांनी तो वेळेत सादर केला नसल्याचाही उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
या प्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ॲड. अमोल मालवणकर यांनी तातडीने ठरावाची आवश्यकता असल्याचे पत्र दिल्यानंतरही विशेष सभेत हा विषय न घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासनाच्या कथित मनमानीला नगराध्यक्ष व काही नगरसेवकांची साथ मिळत असल्याने अशा सभागृहात बसणे म्हणजे त्या कारभाराला समर्थन देण्यासारखे असल्याची भूमिका तेरसे यांनी घेतली आहे. त्यामुळे नगरसेवक म्हणून काम करणे शक्य नसल्याने अत्यंत खेदाने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळविण्याचा प्रयत्न करूनही प्रशासनाकडून साधी दखलही घेण्यात आली नाही. त्यामुळे आपला राजीनामा मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांच्या या राजीनाम्यामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
