विहिरीतून पाणी उपसून लावणी करण्याची वेळ
कुडाळ : यावर्षी पावसाने सुरुवातीला किरकोळ हजेरी लावल्यानंतर अचानक दडी मारल्यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तालुक्यातील चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांवर तर आता पावसाअभावी लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. आपल्या डोळ्यादेखत तयार झालेली रोपे वाळून जाऊ नयेत म्हणून येथील शेतकरी विहिरीचे पाणी डिझेल इंजिन आणि मोटारींच्या साहाय्याने उपसून कशीबशी लावणी उरकून घेण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत.
चेंदवण परिसरातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर विसंबून पेरण्या पूर्ण केल्या होत्या. पिकांची रोपेही लावणीसाठी तयार झाली. मात्र, ऐन लावणीच्या हंगामातच पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतातील पाणी आटले आहे आणि जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांनी आता एकत्र येत पिके वाचवण्यासाठी विहिरीचा आसरा घेतला आहे. विहिरीवरून लांबच लांब पाईपलाईन टाकून, डिझेल इंजिनच्या साहाय्याने शेतात पाणी आणले जात आहे आणि चिखल करून लावणीची कामे केली जात आहेत.
डिझेलच्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. विहिरीतील पाणी उपसून लावणी करणे चेंदवण पडोसवाडीतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत खर्चिक आणि कष्टाचे ठरत आहे. सध्या डिझेलचे दर गगनाला भिडले असल्यामुळे तासंतास इंजिन चालवणे शेतकऱ्यांच्या आर्थिक अवाक्याबाहेर गेले आहे. आधीच बियाणे, खते आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च झाले असताना आता डिझेलसाठी दररोज अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
“पाऊस नसल्याने पारंपरिक शेती करणे अशक्य झाले आहे. विहिरीचे पाणी वापरून शेतकरी लावणी करत आहेत, पण डिझेलचा खर्च पाहता ही शेती आम्हाला कशी परवडणार?” असा संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
