Headlines

हिट अँड रन अपघातातील मृत महिलेच्या वारसांना दोन लाखांची मदत…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पाठपुराव्याला यश..

⚡ओरोस, ता. १०-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे झालेल्या हिट अँड रन अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जानंतर जिल्हास्तरीय समितीने ही मदत मंजूर केली.
१२ जुलै २०२४ रोजी हेमलता मनोहर देसाई व वैशाली विश्वास देसाई (रा. निमजगा-बांदा, ता. सावंतवाडी) या बांदा एसटी स्थानकाकडे जात असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने जखमींना रस्त्यावर सोडून पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. या अपघातात हेमलता देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना १३ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर मृत महिलेचे नातेवाईक अजित मनोहर देसाई यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी हिट अँड रन नुकसानभरपाई योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग येथे अर्ज दाखल केला. प्राधिकरणाने हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सात सदस्यीय समितीकडे पाठविला. समितीने अर्जाची पडताळणी करून मृताच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली.
हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर गंभीर दुखापत झाल्यास ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर सात सदस्यीय समिती कार्यरत असून त्यामध्ये उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असतो.

You cannot copy content of this page