Headlines

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम..

⚡ओरोस, ता. १०-: वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन, मातृ-बाल आरोग्य, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश (व.स्तर) तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, संस्था अध्यक्ष अवधूत मालणकर, शालेय समिती अध्यक्ष मनीष पारकर, मुख्याध्यापक एस. एम. राणे, शिक्षकवृंद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे लिपिक मिलिंद रासम उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना न्यायाधीश नडगदल्ली यांनी सांगितले की, जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या, आरोग्य, शिक्षण, कुटुंब नियोजन, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती करणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे. १९८७ मध्ये जगाची लोकसंख्या पाच अब्जांचा टप्पा गाठल्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (यूएनडीपी) १९८९ पासून जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यास सुरुवात केली, अशी माहिती त्यांनी दिली.
लोकसंख्या वाढीचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम समजून घेणे, कुटुंब नियोजन व मातृ-बाल आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, महिलांचे सक्षमीकरण आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी म्हणून केवळ शिक्षण घेणे नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक उत्तरदायित्व आणि जनजागृतीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एम. राणे यांनी, तर सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक ए. पी. गिते यांनी केले. संस्था अध्यक्ष अवधूत मालणकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page