Headlines

विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील ३ जुलैच्या मोर्चाला मनसेचा जाहीर पाठिंबा…

⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशीवर प्रस्तावित असलेल्या विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या विराट मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पर्यावरण, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन तसेच स्थानिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाम विरोध आहे. स्थानिक जनतेच्या न्याय्य आंदोलनामागे मनसे खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री सिंधुदुर्गमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प येणार नसल्याचे सांगतात, तर दुसरीकडे खासदारांकडून या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांविषयी आक्रमक भूमिका व्यक्त केली जाते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची भूमिका परस्परविरोधी असून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

जनतेसमोर एक भूमिका आणि प्रत्यक्षात दुसरी भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सिंधुदुर्गच्या भवितव्याशी खेळ करू नये. पर्यावरण, स्थानिकांचे हक्क आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या लढ्यात सहभागी होणे ही काळाची गरज आहे.

तरी, ३ जुलै रोजी होणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पविरोधी विराट मोर्चात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या जनआंदोलनाला बळ द्यावे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

संतोष शिंगाडे
कणकवली विधानसभा अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

You cannot copy content of this page