Headlines

लाखेवस्तीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना हटवू नका…

बाबू कुडतरकर:अन्यथा आंदोलन छेडू; तर आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे, यांच देखील लक्ष वेधणार..

⚡सावंतवाडी ता. ३०-: शहरातील गटार व नाले साफसफाईचे काम करणाऱ्या लाखेवस्तीतील कर्मचाऱ्यांना टेंडर संपल्याच्या कारणावरून उद्यापासून कामावर येऊ नये, असा आदेश नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर अन्याय करू नये, त्यांना तातडीने कामावर सामावून घ्यावे, अन्यथा मोठा लढा उभारण्यात येईल, असा इशारा शिंदे शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना कुडतरकर म्हणाले की, लाखेवस्तीतील हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून एका ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील गटार, नाले व स्वच्छतेचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच सावंतवाडी शहर स्वच्छ आणि सुंदर राहिले आहे. मात्र आता केवळ ठेका संपल्याच्या कारणावरून त्यांना कामावरून दूर करणे योग्य नाही.
पालिका प्रशासनाने दिलेला आदेश चुकीचा असून या कर्मचाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी करू नये. शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणी शिंदे शिवसेनेचे नेते तसेच सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचेही लक्ष वेधणार असल्याचे बाबू कुडतरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page