Headlines

राणेंच्या धमकीच्या भाषेला जनता जुमानत नाही…

राणे यांच्या धमकीच्या भाषेवर उपरकरांचा हल्लाबोल.:जैतापूर प्रकल्प, रोजगाराच्या आश्वासनांसह विविध मुद्द्यांवर टीका..

⚡कणकवली ता.२६-: खासदार राणेंच्या फटक्यांच्या धमकीला जनता जुमानत नसल्याची बोचरी टीका माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांनी केली आहे. रत्नागिरी दौऱ्यात अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांबाबत खास. राणेंनी केलेल्या वक्तव्याचा श्री. उपरकर यांनी चांगलाच समाचार घेतला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, खासदार म्हणून लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम सुरू असून विरोधकांबाबत धमकीची भाषा वापरणे अयोग्य आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना फटके घालीन असे म्हणण्यापेक्षा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे आतापर्यंत किती स्थानिकांना रोजगार मिळाला आणि किती वीज निर्मिती झाली, याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने नेहमीच चांगल्या प्रकल्पांचे स्वागत केले आहे. मात्र, जनतेची फसवणूक करणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला आहे. ओरोस येथे २०० कोटी रुपयांचे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, खासदारकीचा कार्यकाळ संपत आला तरी ते केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे घोषणा आणि प्रत्यक्ष काम यामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप श्री. उपरकर यांनी केला.

अणुऊर्जा प्रकल्पामुळे आंबा बागायतदार, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा करत उपरकर म्हणाले की, या सर्वांच्या पाठीशी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ठामपणे उभी राहील आणि प्रकल्पाला विरोध कायम ठेवेल. राणे यांनी पूर्वी काँग्रेसमध्ये असताना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणला होता. त्या प्रकल्पाचे पुढे काय झाले, हे जनतेला सांगावे, अशी मागणीही श्री. उपरकर यांनी केली.

दरम्यान सत्ताधारी पक्षातील काही लोकप्रतिनिधींवरही टीका केली. ते म्हणाले की, एका बाजूला नारायण राणे फटके घालीन अशी भाषा वापरत आहेत, तर दुसरीकडे मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनीही आक्षेपार्ह स्वरूपाची वक्तव्ये केली आहेत, असा आरोप त्यांनी केला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि खासदार करत असल्याची टीकाही उपरकर यांनी केली. निवडणुकीत मतदारांना पैसे देऊन मते घेतली जातात आणि निवडून आल्यानंतर त्याच जनतेशी उन्मत्तपणे वागले जाते, असा आरोप देखील श्री. उपरकर यांनी केला आहे. जनतेने आता अशा प्रवृत्तींविरोधात आवाज उठवला पाहिजे. या लढ्यात शिवसेना जनतेच्या पाठीशी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.यापूर्वी सीवर्ल्ड प्रकल्पाच्या वेळी ग्रामस्थांना तडीपार करण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावेळी जनतेनेच राणे यांना राजकीय धडा शिकविला होता. त्यामुळे आता पुन्हा अशा प्रकारच्या धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. राणे कंपनीची कार्यपद्धती जनतेला समजली असून योग्य वेळी जनता योग्य निर्णय घेईल, असा विश्वासही उपरकर यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page