कणकवली : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकांची ऐतिहासिक कमाई करणारे कोकणचे सुपुत्र अमित अनिल कदम यांचा कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
हरकुळ येथील अमित कदम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत देशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर चाहते, कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिरंगा हातात घेऊन त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आनंदोत्सव साजरा केला.
अनेक वर्षांची कठोर मेहनत, सातत्यपूर्ण प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमित कदम यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकण आणि महाराष्ट्रातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
यावेळी अमित कदम म्हणाले, हे यश माझ्यासाठी अत्यंत खास आहे. देशवासियांचे प्रेम, कुटुंबीयांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या पाठिंब्यामुळेच मी हा टप्पा गाठू शकलो. हे पदक मी भारताला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करतो.
सदिच्छा भेटीदरम्यान पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी अमित कदम यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी फोंडाघाट येथील बबन हळदीवे, माजी सभापती सुजाता हळदीवे, विश्वनाथ जाधव, हेमंत फोंडेकर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
