Headlines

यश मिळविण्यासाठी कौशल्य विकसित करा…

गिरीश तिरोडकर :कुडाळ हायस्कुल मध्ये गुणगौरव सोहळा उत्सहात संपन्न..

⚡कुडाळ ता.२४- : अपयशाने कधीही खचून जाऊ नका कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यश मिळेपर्यंत प्रयत्न करा. यशाला शार्टकट नसतो. कायम अपडेट राहा. एआयच्या(AI) जमान्यात नोकऱ्या मिळणार नाही याची काळजी करू नका. तुमच्यातील कौशल्य विकसित करा यश नक्की मिळेल असा मोलाचा सल्ला सीए गिरीश तिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ मध्ये मंगळवारी विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य, प्रमुख पाहुणे व प्रशालेचे माजी विद्यार्थी सीए गिरीश तिरोडकर, संस्थेचे सीईओ सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक विपिन वराडे, पर्यवेक्षक रंजन तेली, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य नारायण साळवी उपस्थित होते. व्यासपीठावरील सर्वं मान्यवरांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन केले. तदनंतर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरण करण्यात आली. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाचे वाचन श्री अजित व्हनमाने यांनी केले तर दहावीच्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकाचे वाचन मंदार देऊसकर यांनी केले.
यावेली बोलताना श्री. तिरोडकर म्हणाले, मी सुद्धा तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो परंतु अथक प्रयत्नामुळे सनदी लेखापाल (सी.ए.) झालो. माझ्यासारखं यश तुम्हाला सुद्धा मिळू शकतं फक्त गरज आहे प्रयत्नाची. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अनंत वैद्य म्हणाले, तुम्ही शुद्ध भाषा वापरा. उच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असूद्या. भाषिक कौशल्य तुम्ही जर आत्मसात केलात तर कोणत्याही क्षेत्रामध्ये वावरताना तुम्हाला अडचण येणार नाही. मोबाईलचा अतिवापर टाळा, मोबाईल मधून सुद्धा चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतात. म्हणजेच मोबाईलचा सुयोग्य वापर करा असा अत्यंत महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विपिन वराडे यांनी केले. प्रास्ताविकात ते असे म्हणाले की,आमच्या प्रशालेत दरवर्षी विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवतात आणि या पाठीमागे विद्यार्थी व शिक्षक यांची मेहनत महत्त्वाची आहे. विद्यार्थी मनोगतामध्ये दहावीची विद्यार्थिनी कु. आर्या आगलावे व कु.वरदा वारंग यांनी आपण कशा पद्धतीने अभ्यास करून यश मिळवले व शिक्षकांनी आम्हाला चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले हे थोडक्यात सांगितले.
मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक विपीन वराडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ईशस्तवन व स्वागत गीतासाठी श्री गुरुप्रसाद शिरसाट व संगीत विभागाने सहकार्य केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री रंजन तेली यांनी केले तर सूत्रसंचालन सौ.एस. के. वालावलकर यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page