राजू कासकर यांची टीका:नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे नगरसेवकांच दुर्लक्ष..
⚡सावंतवाडी ता.२१-:
सावंतवाडी शहरातील नागरिक सध्या तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या उष्म्यामुळे त्रस्त असताना शहरातील नगरसेवक काश्मीर दौऱ्यावर गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ऐन गरजेच्या काळात लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नगरसेवकांनी दौऱ्याला प्राधान्य दिल्याची टिका मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, सावंतवाडी शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. त्यातच शहरातील रस्त्यांवरील समस्यांबाबतही कोणतेही ठोस नियोजन नसल्याची कासकर यांनी नाराजी व्यक्त केली
तसेच शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच भविष्यातील टंचाईचा सामना करण्यासाठी आवश्यक नियोजन करणे गरजेचे असताना नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्यांकडे पाठ फिरवल्याचा आरोप राजू कासकर यांनी केला आहे. प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नसलेल्या नगरसेवकांमुळे शहरवासीयांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची टीकाही करण्यात आली.नागरिकांच्या दैनंदिन समस्यांकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राजू कासकर यांनी केली आहे.
