⚡सिंधुदुर्ग दि.२१-: कोकणातील आंबा व काजू पिकांचे झालेले मोठे नुकसान, लांबलेल्या पावसाळ्यामुळे मच्छीमार बांधवांची झालेली परवड, तसेच राज्यभर एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गडद संकट या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यंदा २३ जून रोजीचा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टद्वारे त्यांनी हा निर्णय जाहीर करताना, सध्याच्या कठीण परिस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा परिस्थितीचे भान राखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिक नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना वाढदिवसाचा उत्सव टाळण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच आपल्या सर्व हितचिंतक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेटीसाठी येऊ नये, असे आवाहन करत प्रत्येकाने आपल्या जिल्ह्यात ‘गो-सेवा’ आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले आहे. गौसंवर्धन, गरजूंना मदत आणि समाजहिताची कार्ये हीच खरी वाढदिवसाची भेट असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तुमचा सेवाभाव हीच माझ्यासाठी लाखमोलाची सदिच्छा असेल, असे सांगत मंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना समाजसेवेच्या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले असून शेवटी “जय श्री राम” असा संदेश दिला आहे.
