बांदा/प्रतिनिधी
इन्सुली क्षेत्रफळवाडीतील डोबवाडी येथे संतोष नेवगी यांच्या विहिरीमध्ये असलेल्या मादी मगर आणि तिच्या १५ पिल्लाना वनविभागाच्या जलद कृती दलाने रेस्क्यू करत सुरक्षित बाहेर काढले. सर्व मगरिंची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
नेवगी यांच्या विहिरीत मगर असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाहणी केली असता विहिरीत सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे निदर्शनास आले.
यानंतर विहिरीतील पाणी मोटारीच्या साहाय्याने कमी करण्यात आले. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर विहिरीमध्ये एक प्रौढ मगर आणि तिची तब्बल १५ पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या बचाव पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत सर्व मगरींना यशस्वीरित्या पकडून त्यांची सुटका केली.
यावेळी उपवनसंरक्षक मिलीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, वनरक्षक अतुल पाटील, वनपाल महादेव मोहिते तसेच सावंतवाडी जलद कृती दलाचे (रॅपिड रेस्क्यू टीम) प्रमुख बबन रेडकर, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ आणि देवेंद्र परब यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
बचाव करण्यात आलेल्या मगर व तिच्या पिल्लांना सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. वनविभागाच्या या तत्पर आणि धाडसी कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
फोटो:-
इन्सुली येथे विहिरीत असलेल्या मगर व तिच्या पिल्लाना वनविभागाच्या पथकाने सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.
विहिरीत अडकलेल्या मगरीसह १५ पिल्लांची वनविभागाकडून सुखरूप सुटका…
