सभापती हर्षदा वाळके यांची माहिती..
कणकवली : पंचायत समिती कणकवली आणि स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती कणकवली येथे गावठी आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी १५ जून २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कणकवली पंचायत समिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत सभापती हर्षदा वाळके बोलत होत्या. यावेळी उपसभापती राजेश (सोनू) सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. वालावलकर यांच्यासह पंचायत समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या की, राज्य शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबरोबरच शेतीमालाचे मूल्यवर्धन व्हावे यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शाश्वत विकासाच्या संकल्पनेत ‘गरिबीमुक्ती आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव’ ही महत्त्वाची थीम असून, त्याच उद्देशातून या गावठी आठवडी बाजाराची सुरुवात करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजारपेठ मिळावी आणि त्यांना योग्य दर मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या गावठी आठवडी बाजाराचे उद्घाटन सोमवारी होणार असले तरी त्यानंतर नियमित आठवडी बाजार दर शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत भरविण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे ४० विक्रेत्यांनी नोंदणी केली असून, त्यापेक्षा अधिक विक्रेत्यांसाठीही जागा उपलब्ध आहे. पंचायत समितीच्या जुन्या इमारतीच्या आवारात व प्रांगणात शेड उभारून स्वच्छतेची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामुळे पावसाळ्यातही बाजार सुरळीत सुरू राहू शकतो.
या बाजारात शेतकऱ्यांच्या शेतात पिकणारा भाजीपाला, नगदी पिके, तृणधान्ये तसेच मूल्यवर्धित उत्पादने जसे की पीठ, मसाले आणि विविध खाद्यपदार्थ यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर रानभाज्या, फूड स्टॉल, गावठी कोंबड्या, अंडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ यांनाही स्थान दिले जाणार आहे.
नोंदणीकृत विक्रेत्यांसाठी सुरुवातीला गट तयार करण्यात आले असून, सलग काही आठवडे बाजारात नियमित सहभाग नोंदवणाऱ्या विक्रेत्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य देण्यात येणार असले तरी जिल्ह्यातील इतर भागांतील दर्जेदार उत्पादने असलेल्या विक्रेत्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन दोघांनाही फायदा होणार असल्याचा विश्वास सभापती हर्षदा वाळके यांनी व्यक्त केला.
