नगरसेवक, प्रशासनाचे लक्ष वेधून दुर्लक्ष: दोन्ही नगरसेवक टक्केवारी मध्ये गुंतलेत,दिपाली सावंत यांचा आरोप; त्वरित दखल घ्या अन्यथा नगरपालिकेला घेराव घालू..
⚡सावंतवाडी, ता. १३-:
सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील न्यू- सबनीसवडा परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार नगरसेवक व नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही समस्या सुटत नसल्याचा आरोप शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी केला आहे. दरम्यान सध्याच्या दोन्ही नगरसेवकांचे प्रभागात लक्ष नसून त्यांचं लक्ष फक्त टक्केवारी घेण्यामध्येच आहे असा आरोपी त्यांनी यावेळी केला आहे.
त्या बोलताना म्हणाल्या, न्यू- सबनीसवाडा परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून पावसामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे. तसेच ठिकठिकाणी कचरा साचणे, गटारे तुंबणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे सावंत यांनी सांगितले.यावेळी त्यांनी प्रभागातील दोन्ही नगरसेवकांवर टीका करत, “नगरसेवक केवळ दुचाकीवरून पाहणी करतात; मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते मैदानात उतरत नाहीत,” असा आरोप केला. तसेच दोन्ही नगरसेवक कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.पालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती, स्वच्छता व गटारांची समस्या सोडवावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेला घेराव घालण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेविका दिपाली सावंत यांनी दिला आहे.
