खासकीलवाड्यातील क्रिकेट ॲकेडमीमुळे नागरिक त्रस्त…

ॲकेडमी बंद करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी:रस्त्यावर वाहने पार्किंग, गोंगाट व वाहतुकीस अडथळ्यांमुळे रहिवाशांचा संताप ..

सावंतवाडी : क्रिकेट ॲकेडमीचा रहीवाशांना होत असलेल्या त्रासाबाबत खासकीलवाडा येथील नागरिकांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांचे लक्ष वेधले. सुचना देऊन देखील सुधारणा होत नसल्याने आरक्षित जागेवर असणारी ही क्रिकेट ॲकेडमी बंद करण्याची मागणी रहीवाशांनी केली आहे ‌

गेल्या काही वर्षांपासून वॉर्डमधील नगरपरिषदेच्या आरक्षित जागेवर क्रिकेट ॲकेडमी व्यावसायिक तत्त्वावर चालू करण्यात आलेली आहे. सध्या दुपारी ३.०० ते रात्रौ १० पर्यंत ती सुरु असते अॅकेडमीमध्ये येणारी मुले या ठिकाणच्या रहदारीच्या रस्त्यावर वॉर्मअप करतात, खेळतात, तसेच आपली वाहने रस्त्यावर पार्क करतात. तसेच मुले रस्त्यावर घोळका करुन गप्पागोष्टी, भांडणे वगैरे करीत असतात. त्याचप्रमाणे मोठमोठ्याने ओरडत असतात. याबाबत मुलांना व त्यांच्या प्रशिक्षकांना सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर पार्क करुन ठेवलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन प्रसंगी भांडणतंटे होत असतात. याचप्रमाणे परिसरातील रुग्णांना सततच्या गोंगाटाचा मोठा त्रास होत असून वेळप्रसंगी एखाद्या व्यक्तीस तात्काळ रुग्णालयास न्यावयाचे असल्यास रस्त्यावर पार्क करुन ठेवलेल्या वाहनांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावर पार्क केलेली वाहने बाजूला लावण्यास सांगितल्यासही त्यात दाद दिली जात नाही. त्यामुळे तक्रार अर्जाची गंभीर दखल घेऊन सदरची क्रिकेट ॲकेडमी तात्काळ बंद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी सुरेश निर्गुण,उदय निर्गुण, प्रतीक निर्गुण, संदीप राणे, समीर पडते, दिप्ती सुर्वे, राजश्री निर्गुण, मयूर सुभेदार, नंदादीप विचारे, सुनील नाईक, महेश पांचाळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page