माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन..
⚡सावंतवाडी ता.११-:
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली-रेडी महामार्गावरील चौकीकरवाडी येथे संरक्षक भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी न्हावेलीचे माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्याकडे केली.
यावेळी पार्सेकर यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी केवळ पत्र्याचे बॅरेल उभे करण्यात आले असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने महामार्गाची सीमा ओळखणे कठीण होते. परिणामी या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्यांना अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली गेली नसल्याने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच सेवा संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष प्रवीण पंडित यांनीही तालुक्यातील विविध रस्त्यांच्या समस्यांवर चर्चा केली. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली.
निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बांदा-शेर्ले-डोणकल मार्गावरील कापईवाडी पुलावरील अपूर्ण काँक्रीटीकरण तात्काळ पूर्ण करण्याची तसेच निगुडे-सोनुर्ली महामार्गावर साचणाऱ्या पाण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली.
दरम्यान, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांनी न्हावेली-रेडी महामार्गावरील संरक्षक भिंतीच्या मागणीची दखल घेत उपअभियंता अजित पाटील व कनिष्ठ अभियंता विजय लोहार यांना तात्काळ पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित ठिकाणच्या पुलाला मंजुरी मिळालेली असून त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती उपअभियंता अजित पाटील यांनी दिली.
या भेटीवेळी प्रवीण पंडित, अक्षय पार्सेकर, गुरुदास गवंडे, ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर, श्रेयश गावडे, सौरभ पार्सेकर, दीपक पार्सेकर, अनिकेत धवण, रोहित निर्गुण, आकाश निर्गुण आदी उपस्थित होते.
