मालवण येथे १३ रोजी “समुद्ररक्षक संमेलन २०२६” चे आयोजन…

⚡मालवण ता.११-:
समुद्र संवर्धन, किनारी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “समुद्ररक्षक संमेलन २०२६” चे आयोजन शनिवार, दि. १३ जून रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत दादा शिखरे सभागृह, बॅ. नाथ पै सेवांगण, धुरीवाडा, मालवण येथे करण्यात आले आहे, अशी माहिती सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खंडाळेकर, डॉ. ज्योती तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, वनशक्ती संस्थेचे यथार्थ खवणेकर, युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा, व्यवस्थापक संजय आचरेकर आदी व इतर उपस्थित होते.

या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून स्थान बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरण अभ्यासक व वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद व प्रमुख अतिथी म्हणून मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर या उपस्थित राहणार आहेत.

मालवण, तारकर्ली, देवबाग, आचरा, तोंडवळी व संपूर्ण सिंधुदुर्ग किनारपट्टीची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात समुद्र, मत्स्य व्यवसाय आणि पर्यटनावर अवलंबून आहे. वाढते समुद्र प्रदूषण, प्लास्टिक कचरा, किनारी पर्यावरणावरील दबाव, सागरी जैवविविधतेचे संवर्धन आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर या संमेलनात चर्चा होणार असून समुद्र संवर्धनासाठी सामूहिक कृती आराखड्यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. तसेच कोकणात येऊ घातलेले विविध प्रकल्प व त्यामुळे येथील पर्यावरणावर होणारे परिणाम, भविष्यातील कोकण कसे असेल, पर्यटनासह विविध उद्योगात कार्यरत असणाऱ्या उद्योजकांची समुद्र पर्यावरणायाविषयी असलेली सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर या संमेलनात चर्चा होणार आहे.

या संमेलनात स्टॅलिन दयानंद हे मार्गदर्शन करणार आहेत. स्टॅलिन दयानंद हे गेली अनेक वर्षे पर्यावरण संरक्षण, किनारी परिसंस्था, खारफुटी, पाणथळ प्रदेश, नद्या आणि जैवविविधता संवर्धनासाठी कार्यरत आहेत. वनशक्ती संस्थेमार्फत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक पर्यावरणीय विषयांवर जनजागृती, संशोधन आणि कायदेशीर लढ्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. या संमेलनात “विनाश की विकास? : प्रश्न कोकणाचा” या विषयावर ते कोकणातील विकास प्रकल्प, पर्यावरणीय परिणाम, किनारी परिसंस्था, स्थानिक उपजीविका आणि शाश्वत विकास याबाबत विचार मांडणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

गेली दोन वर्षे वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने मालवण परिसरात समुद्रतळ स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे समुद्रातील प्लास्टिक व इतर कचरा काढून सागरी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आठ स्कुबा डायव्हर्सचा या संमेलनात विशेष गौरव करण्यात येणार आहे.

या संमेलनादरम्यान National Fisheries Digital Platform (NFDP) वर नोंदणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मच्छीमार, गरकडी, पागली, मासे विक्रेते, खुबे अथवा कालवे काढणारे, मत्स्यशेती करणारे तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

समुद्र संवर्धन ही केवळ पर्यावरणाची गरज नसून मालवणच्या अर्थव्यवस्थेचे, पर्यटनाचे, मत्स्य व्यवसायाचे आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याचे संरक्षण आहे. त्यामुळे या संमेलनास मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित सर्व घटक, सिंधुदुर्ग किल्ला व इतर पर्यटनस्थळांसाठी प्रवासी वाहतूक करणारे बोट चालक, मच्छीमार संघटना, रापण संघ, पर्यटन संघटना, हॉटेल व पर्यटन व्यावसायिक, स्कुबा डायव्हिंग व वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, सोशल मीडिया इंफ्लूएन्सर, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच पर्यावरण प्रेमी व सर्व जागरूक मालवणवासीय नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी सर्व आयोजकांच्या केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९४२२९६७९६४ / ९७६९६७९५३२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page