भाजपच्या अजित नाईक यांची प्रत्यक्ष कृतिद्वारे विरोधकांना चपराक..
⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी या मुख्य मार्गांनजिक अपूर्ण कामाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान याबाबत मठ भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अजित नाईक यांनी विद्युत वितरण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन बुधवारी सकाळपासून तीन ठिकाणी अंडरग्राउंड वीजवाहिन्या खोदाई काम तातडीने हाती घेण्यात आले.
मठ सरपंच सौ. रुपाली नाईक व भाजपाचे पदाधिकारी अजित नाईक यांनी वेंगुर्ला सभापती शंकर घारे यांची भेट घेऊन माहिती दिल्यावर सभापती शंकर घारे यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर या कामास सुरुवात करण्यात आल्याने वाहनधारकांनी विद्युत वितरणबाबत समाधान व्यक्त केले आहे. आज बुधवारी सकाळी ते सायंकाळी उशिरापर्यंत येथील काम सुरु करण्यात आल्याने नागरिक व वाहनधारकांनी मठ सरपंच रुपाली नाईक व भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांच्या कार्यतत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
मठ हा जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग असल्याने अजित नाईक यांनी तातडीने लक्ष घालीत पाठपुरावा केल्याने होणारे अपघात कमी होणार आहेत. मठ टाकयेवाडी, मठ मठकरवाडी आदी भागात अंडरग्राउंड विजवाहिनी पाईप उघड्यावर असल्याने तातडीने येथे दोन्ही ठिकाणी खोदाई करून हे काम करण्यात आले. तसेच मठ कुडाळतिठा भागातही खोदाईचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे अजित नाईक यांच्यासह सभापती शंकर घारे, वेंगुर्ला वीजवितरण अभियंता चंद्रशेखर पेटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राहुल अडोळे यांनी तातडीने सहकार्य करून हे काम सुरु करण्यात आल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. मागील कालावधीत विद्युत वितरण मार्फत झाडी कटिंग करून गटारात टाकण्यात आली होती. सदर मठ गावठणवाडी कार्यक्षेत्रात हे काम सायंकाळी सुरु होते. तर गुरुवारी खचलेल्या रस्ता “साईडपट्टीचे मजबुतीकरण’ करण्यात येणार आहे. तसेच मठ मठकरवाडी ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी गटार भरावाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे पदाधिकारी अजित नाईक यांनी दिली.
