ठाकरेसेनेचे अमरसेन सावंत यांनी दिला थेट इशारा :कालेली ग्रामस्थांचा ठाकरेसेनेवरच विश्वास ..
⚡कुडाळ ता.०९-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी पक्ष आणि सर्व शिवसैनिक खंबीरपणे उभे आहेत. शासकीय यंत्रणांचा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सर्रास गैरवापर करून सुरू असलेल्या चौकशांना वेळ पडल्यास ‘शिवसेना शैली’त चोख उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा शिवसेना उबाठाचे उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी दिला आहे.
कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आज झालेल्या शिवसेना उबाठाच्या पत्रकार परिषदेत अमरसेन सावंत बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, पंचायत समिती सदस्य योगेश धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन कदम, नितीन म्हाडेश्वर आदी प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
अमरसेन सावंत म्हणाले की, सन २०२२ मध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि पक्षातून अनेक जण फुटले. मात्र, वैभव नाईक हे निष्ठावंत राहिले आणि त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. केवळ हाच एक राग मनात ठेवून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून सातत्याने दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप नेत्यांनी केला.
२०२२ पासून वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीवर सातत्याने वेगवेगळ्या चौकशा लावल्या जात आहेत. विशेष म्हणजे, एसीबीचे अधिकारी बदलले की नव्याने चौकशीचा बडगा उगारला जातो. आधीच्या चौकशांचे सर्व रेकॉर्ड फाईलवर उपलब्ध असताना, नवीन अधिकारी आल्यावर पुन्हा तीच चौकशी कोणत्या हेतूने सुरू केली जाते?असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. वैभव नाईक हे कधीही कोणत्याही महामंडळावर किंवा मंत्रीपदावर नव्हते, त्यांचा व्यवसाय हा पूर्णपणे वडिलोपार्जित असून त्यातील सर्व आर्थिक उलाढाली कायदेशीर आहेत, असेही श्री सावंत यांनी स्पष्ट केले.
आज राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील असलेले अनेक मोठे मंत्री आणि नेते पूर्वी भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली अडकले होते. मात्र, त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावरचे सर्व आरोप ‘निल’ करण्यात आले. सत्ताधारी पक्ष स्वतः भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन आपला पक्ष भ्रष्टाचारी बनवत आहे आणि दुसरीकडे जे निष्ठावंत दबावाला बळी पडत नाहीत, त्यांना नाहक त्रास दिला जात आहे,अशी टीका श्री सावंत यांनी करत गॅस सिलिंडर आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर सातत्याने वाढत असून, महागाईविरोधात जनतेसाठी केलेल्या आंदोलनानंतर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे नाक दाबून दडपशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. नुकत्याच झालेल्या १४ विकासकामांच्या भूमिपूजनाचा दाखला देत, मूळ कार्यकर्त्यांना डावलून ‘अॅडव्हान्स’ कामे मारण्याचे आणि कामे विकण्याचे धंदे सध्या सत्ताधाऱ्यांकडून जोरदार सुरू असल्याचा आरोप यावेळी श्री सावंत यांनी करत आ. निलेश राणे यांनी मालवणमधील भ्रष्टाचारावर घेतलेल्या आक्षेपांचा दाखला देत, त्यांनी आता स्वतःच्या कार्यकर्त्यांवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे, असा टोला लगावला.
शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेत तालुका प्रमुख राजन नाईक यांनी पलटवार केला. यावेळी श्री नाईक म्हणाले की, ज्यांना स्वतःच्या गावातून साधे ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही निवडून येता आलेले नाही, त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर बोलू नये. करलकर यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून त्यांचे ‘कमिशन एजंट’चे व्यवहार समोर आले आहेत. त्यांनी जर अशीच नाहक टीका चालू ठेवली, तर त्यांचा सर्व जुना इतिहास पुराव्यासहित बाहेर काढू.असा इशारा श्री नाईक यांनी देत ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेमध्ये लावून दाखवली.
कालेली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ‘उबाठा’ची सत्ता कायम
कुडाळ तालुक्यातील कालेली ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उबाठाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. गेल्या १५ वर्षांची परंपरा मोडीत काढण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेने सरपंच फोडून आपल्याकडे नेण्याचे राजकारण केले होते.
यावर बोलताना तालुकाप्रमुख कृष्णा धुरी म्हणाले की, आमचा सरपंच फोडून नेणाऱ्यांना कालेलीच्या जनतेने या पोटनिवडणुकीत मतपेटीतून चोख उत्तर दिले आहे. ग्रामस्थांनी आणि कार्यकर्त्यांनी विरोधकांचे मनसुबे उधळून लावले असून ‘गाव पॅनेल’च्या माध्यमातून आमचा हक्काचा सरपंच निवडून आणला आहे. तर सततची फोडाफोडी आणि राजकीय अस्थिरतेला कंटाळून पक्षाचे चिन्ह बाजूला ठेवून, गावातील चांगल्या आणि एकनिष्ठ माणसांना एकत्र आणून ही निवडणूक लढवली गेली, असे अमरसेन सावंत यांनी स्पष्ट केले.
