देवगडात ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांसाठी मोफत धान्य वाटप…

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम..

⚡देवगड ता.०७-: क्षयरोगमुक्त भारत अभियानाला बळकटी देण्यासाठी आणि क्षयरुग्णांना पोषणयुक्त आहाराची मदत मिळावी या उद्देशाने श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या वतीने शासनाच्या ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे.

देशातून क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी केंद्र व राज्य शासन विविध योजना राबवत आहेत. या अभियानाला हातभार लावत सामाजिक उत्तरदायित्व जपत श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने क्षयरुग्णांच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. उपचारांसोबतच पोषणयुक्त आहार मिळाल्यास रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून उपचारांना अधिक चांगला प्रतिसाद मिळतो. याच हेतूने गरजू क्षयरुग्णांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयवंत मोरे (जिल्हा क्षयरोग अधिकारी, सिंधुदुर्ग), डॉ. अजित दवळे (तालुका आरोग्य अधिकारी, देवगड), श्री. सुहास कांबळे (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, देवगड), डॉ. कपिल मैत्री आणि डॉ. मेहुल जाधव (वैद्यकीय अधिकारी, मिठबाव) उपस्थित राहणार आहेत. तसेच कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच श्री. महेश ताम्हणकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या उपक्रमासाठी तालुका आरोग्य कार्यालय, देवगड तसेच जिल्हा क्षयरोग कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. शासनाच्या ‘निश्चय मित्र’ संकल्पनेला मूर्त स्वरूप देत समाजातील विविध घटकांनी क्षयरुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टकडून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाची जपलेली परंपरा अधोरेखित करणारा असून, क्षयरुग्णांना दिलासा देणारा ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

You cannot copy content of this page