वीज समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध…

आमदार प्रमोद जठार: पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार..

⚡सावंतवाडी ता.०५- : २०१४ पर्यंत महाराष्ट्रात १४-१४ तास लोडशेडींग व्हायचं. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर देशात अन् राज्यात आपण स्वयंपूर्ण झालो आहोत. ‘वन नेशन, वन ग्रीड’ अंतर्गत सगळी ग्रीड एकमेकांना जोडली गेलीत. वीजेचे आताचे प्रश्न झाड, फांद्या पडल्याने होत आहेत‌. ते सुद्धा मार्गी लागतील. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भूमीगत वाहिन्यांच काम कोकणात सुरू असून ते पूर्णत्वास आल्यानंतर वीज समस्या कायमची संपेल, तक्रारी करण्यासाठी नाही तर समस्या सोडविण्यासाठी आपण आहोत अस मत भाजप आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या पुढाकारातून आयोजित वीज समस्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आम. जठार यांच्या उपस्थितीत वीज समस्यांबाबतची बैठक येथील काझी शहाबुद्दीन सभागृहात पार पडली. यावेळी उपस्थितांनी वीज समस्यांचा पाढा वाचला. यावेळी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, ॲड सिद्धार्थ भांबुरे, विलास जाधव, संदीप सावंत, राजू पनवेलकर, दादा मडकईकर, दिलीप भालेकर, संतोष गांवस, दत्तप्रसाद गोठसकर, मधूकर घारपुरे, महेश खानोलकर, मनोज घाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी आम. जठार पुढे म्हणाले, सावंतवाडीतील नागरिक, पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या मांडल्या आहेत. आचारसंहितेमुळे अधिकारी आले नसले तरीही उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून दर महिन्याला वीज वितरणच्या कामाचा पाठपुरावा केला जाणार आहे. यातून जनतेच्या समस्या सोडवल्या जातील. सागरी किनारपट्टीच्या शेजारील गावातील वीज वाहिन्या भूमीगत करण्यासाठी केंद्र सरकारकडून हजारो कोटींचा निधी देखील दिला आहे. ते काम देखील सुरू असून कोकणात अंडरग्राऊंड वीज वाहिन्या झाल्यानंतर वीज तुटण्याचा प्रश्न येणार नाही. अपारंपारिक उर्जा, सोलारसह अनेक नवीन प्रयोग सरकार वीज निर्मितीसाठी करत आहेत. वीज स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. लोडशेडींग राहणार नाही यासाठी आम्ही काम करणार असून येणाऱ्या अधिवेशनात याबाबत मुद्दे मांडू, कोणाच्याही कोंबड्यानं दिवस उजाडावा हा आमचा हेतू आहे‌.‌ लोककल्याणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू असा विश्वास श्री. जठार यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page