भाजपकडून पर्यावरण रक्षणाचा संकल्प || जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वोदय नगर येथे वृक्षारोपण..
⚡सावंतवाडी ता.०५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथे “एक पेड माँ के नाम” या अभियानांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आयोजित या उपक्रमात कांचन, मोहगणी, बहावा आदी विविध प्रकारची १५ झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या “एक पेड माँ के नाम” या उपक्रमाद्वारे आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले. तसेच निसर्ग रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वृक्षारोपण मोहिमेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्येक विभागातील बूथवर किमान २५ झाडे लावण्याचे निर्देश आमदार प्रमोद जठार यांनी नगरसेवकांना दिले. सावंतवाडी शहर हिरवेगार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षा श्रद्धाताई भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेताताई कोरगावकर, मंडल अध्यक्ष तथा आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, रणजीत देसाई, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन समिती सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, तसेच निलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेना नगरसेवक अजय गोंदवले उपस्थित होते.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर व बूथ पातळीवरील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वृक्षारोपण मोहिमेमुळे परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
