⚡सावंतवाडी ता.०३-: तालुक्यातील कारिवडे येथे एका विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना महावितरणच्या कर्मचाऱ्याला विजेचा तीव्र धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शॉक लागल्यामुळे हा कर्मचारी थेट जमिनीवर कोसळला. प्रज्योत नाईक असे या जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सुदैवाने या गंभीर प्रसंगातून ते बालंबाल बचावले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
प्रज्योत नाईक हे विद्युत विभागाचे कर्मचारी असून ते नेहमीप्रमाणे कारिवडे गावात कामानिमित्त विद्युत खांबावर चढले होते. काम सुरू असतानाच अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला आणि नियंत्रण सुटल्याने ते खांबावरून खाली जमिनीवर कोसळले. हा प्रकार पाहताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य विद्युत कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. ग्रामस्थांनी व सहकाऱ्यांनी कोणतीही वेळ न दवडता प्रज्योत नाईक यांना तात्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांनी तातडीने त्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक ते उपचार सुरू केले. सुदैवाने प्रज्योत यांच्यावर कोणताही गंभीर प्रसंग ओढवला नसून त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन प्रज्योत नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच ‘जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान’चे अध्यक्ष राजू मसूरकर यांनीही रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी प्रज्योत यांच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत, रुग्णालयातील डॉक्टरांना सदर कर्मचाऱ्याला सर्वोत्कृष्ट आणि योग्य ते वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी विनंती केली आहे. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असला, तरी सुदैवाने प्रज्योत नाईक यांची प्रकृती ठीक असल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला आहे.
