जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेकडे सत्ताधारी-विरोधकांची पाठ; रुग्णांचे हाल सुरूच…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांच्या गंभीर समस्यांकडे ना सत्ताधारी लोकप्रतिनिधी लक्ष देताना दिसत आहेत, ना विरोधक. त्यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा वाली नेमका कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि इतर आवश्यक मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत असून नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळणे कठीण बनले आहे.

याचे ठळक उदाहरण म्हणजे कणकवली उपजिल्हा रुग्णालय. हे रुग्णालय सध्या केवळ दोन डॉक्टरांच्या भरवशावर सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध डॉक्टरांची कमतरता यामुळे रुग्णसेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासनाची इच्छा असूनही पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना अपेक्षित उपचार देणे कठीण होत चालले आहे.

आरोग्य सुविधांच्या या गंभीर प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिकच संकटात सापडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page