गोव्याच्या धर्तीवर शिरोडा येथे सिंधुदुर्ग पर्यटन विभागामार्फत सुविधा व्हाव्यात…

मनोज उगवेकर ; जीवरक्षक यांना “योग्य मोबदला” देणे अत्यावश्यक बाब..

⚡वेंगुर्ला ता.०२-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. परंतु येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनामार्फत योग्य उपाययोजना होणे आवश्यक आहे. येथील पर्यटन वाढीसाठी गोवा राज्याप्रमाणेच विविध कायमस्वरूपी सुविधा तातडीने उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे, असे मत शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच तथा भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष मनोज उगवेकर यांनी बोलताना व्यक्त केले. शिरोडा वेळागर समुद्रात मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील ( गडहिंग्लज )एक पर्यटक बुडाल्याची घटना घडली. शिरोडा हे पर्यटनदृष्ट्या विकासाचे हब म्हणून निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षात शिरोडा वेळागर समुद्रात छोट्या तसेच मोठ्या दुर्घटना घडून अनेक युवक -पर्यटक जीवितास मुकले आहेत. शासनाकडे विविध सुविधा बाबत, कायमस्वरूपी पोलीस उपलब्धतेबाबत कायम मागणी करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जीवरक्षक व अन्य सुविधा यांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करू शकत नाही. याबाबत पर्यटन विभागाकडून याची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. शासनामार्फत रोबोट साधन सामूग्री पुरविली जाते, परंतु त्याचे ऑपरेटिंग, त्याची वेळोवेळी हाताळणी होणे आवश्यक आहे. शिरोडा येथे केवळ एकच जीवरक्षक कार्यरत असून शासनामार्फत ‘जीवरक्षक टीम ‘ कार्यरत ठेवणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेमार्फत शिरोडा वेळागर समुद्रकिनारी वेळोवेळी पेट्रोलिंग होणे आवश्यक आहे. आज गोवा राज्यात शासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या उपाययोजना अंमलात आणल्यामुळे गोवा राज्य पर्यटनदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विभागाकडून वेंगुर्ला तालुक्यातील प्रमुख समुद्रकिनारी अद्ययावत सुविधा देणे आवश्यक आहे. विशेषतः गोव्याप्रमाणेच सिंधुदुर्ग पर्यटन विभागाकडून जीवरक्षक भरती करून त्यांना याचा “योग्य मोबदला” दिल्यास योग्य ठरेल.
शासनामार्फत मच्छीमारांना अलर्ट सुविधा दिल्या जातात, त्याचप्रमाणे पर्यटकांनाही अलर्ट सूचना देणे आवश्यक आहे.पर्यटन वाढीसाठी गोव्याच्या धर्तीवर पर्यटकांना योग्य सुविधा, मार्गदर्शन केल्यास होणारी जीवितहानी टळू शकते. आज सागरतीर्थ व अन्य एरियात राहणारे पर्यटक रेडी, शिरोडा समुद्रकिनारी येतात. पण शासनाच्या दुर्लक्षामुळे अशा आकस्मिक दुर्घटनामुळे शिरोडा गावाचे नाव आज बदनाम होत आहे व एकंदरीत याचा मोठा परिणाम पर्यटन वाढीवर होत आहे. त्यामुळे गव्हर्मेंटने याकडे तातडीने लक्ष पुरविणे, आवश्यक आहे.

You cannot copy content of this page