इन्सुली सर्विस रोडवर वाढला अपघाताचा धोका…

रंबलिंग पट्ट्यांसह सुरक्षा उपाययोजनांची नितीन राऊळ यांची मागणी.

⚡बांदा ता.०२-: जुन्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील संत सोहिरोबानाथ मंदिर ते इन्सुली हायस्कूल दरम्यान दोन्ही बाजूकडील सर्विस रोडवर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून प्रत्यक्षात अनेक अपघात घडलेही आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ रंबलिंग पट्टे व इतर सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या उपअभियंत्या वृषाली पाटील यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संत सोहिरोबानाथ मंदिर व इन्सुली हायस्कूल दरम्यान डाव्या व उजव्या बाजूच्या सर्विस रोडवर पादचारी, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र, दोन्ही बाजूंनी येणारी वाहने अतिवेगाने जात असल्याने नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. अपघातांचे सत्र रोखण्यासाठी आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी या भागात सर्विस रोडवर दोन्ही बाजूंना रंबलिंग पट्टे बसवणे, आवश्यक वाहतूक सूचना फलक लावणे व अन्य सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबवणे अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहणी करावी आणि आवश्यक ती कार्यवाही युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी मागणी नितीन राऊळ यांनी केली आहे.

You cannot copy content of this page