बांदा ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक कधी..?

नागरिकांत तीव्र नाराजी: आंदोलनाचा दिला इशारा…

⚡बांदा ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बांदा ग्रामपंचायतीला अद्याप कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळालेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत बांदा येथील वासुदेव भोगले यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून तातडीने नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा ग्रामपंचायतीमध्ये नियमित ग्रामसेवक उपलब्ध नसल्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. दाखले, करसंबंधित कामे, विविध योजनांचे अर्ज, अभिलेख तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असतानाही ग्रामसेवक नसल्याने विकासकामे आणि दैनंदिन प्रशासनावर विपरीत परिणाम होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत बांदा ग्रामपंचायतीत तब्बल पाच उपसरपंच बदलले, मात्र ग्रामपंचायतीसाठी नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही. कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या आणि तालुक्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बांदा ग्रामपंचायतीची ही अवस्था नागरिकांसाठी तसेच प्रशासनासाठीही खेदजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामसेवकाच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांची दैनंदिन कामे खोळंबत असून विकासकामांच्या अंमलबजावणीवरही परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत असल्याचे भोगले यांनी म्हटले आहे. या गंभीर बाबीची दखल घेऊन बांदा ग्रामपंचायतीसाठी तात्काळ कायमस्वरूपी ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विचार करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचारी “या महिन्यात ग्रामसेवक येणार” अशी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page