आमदारकीचा केसरकरांनी राजीनामा द्यावा…

कॉग्रेसची मागणी: मतदार संघातील जनतेला विकासाऐवजी केवळ दिले पोकळ आश्वासने..

सावंतवाडी : सावंतवाडीत कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय बैठक येथे काँग्रेस कार्यालय, सावंतवाडी येथे पार पडली. ऐतिहासिक सावंतवाडी मतदारसंघाचे रूप भकास करत फक्त आश्वासन देणारे आमदार दीपक केसरकर यांनी आपला तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी अवैध मायनिंग माफिया, अवैद्य धंदे आणि शालार्थ आयडी घोटाळ्याची ‘एसआयटी’ चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर हे अकार्यक्षम ठरले आहेत. त्यांनी मतदारसंघाला विकासाऐवजी केवळ पोकळ आश्वासने दिली आहेत. निवडणुकीपुरती जनतेला स्वप्ने दाखवायची आणि नंतर गायब व्हायचे, हाच त्यांचा धंदा आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी श्री‌. मोंडकर यांनी केली आहे‌. तसेच मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची एक वीटही रचली नाही सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणार म्हणून मोठ्या थाटामाटात भूमिपूजन उरकले. मात्र, प्रत्यक्षात आज तिथे एक वीटही रचली गेलेली नाही. मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे व्हेंटिलेटरवर असून, जनतेला उपचारासाठी अजूनही गोवा किंवा मुंबईची वारी करावी लागत आहे.

अशोक खरात याच्या भावाला बोगस शालार्थ आयडी देण्यात थेट केसरकरांचाच हात होता का असा सवाल त्यांनी केला. दीपक केसरकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशोक खरातच्या घरी घेऊन गेले होते. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे. तर गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला आंबोली आणि चौकुळ भागातील ‘कबुलायतदार जमीन प्रश्न’ सोडवण्यात आमदारांना साफ अपयश आले आहे. निवडणुक आली की यावर केवळ राजकारण करायचे आणि नंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे हेच त्यांचे धोरण राहिले आहे. केसरकर हे राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणारे दलबदलू नेते आहेत असा टोला त्यांनी लगावला. तीन पक्ष बदलून झाल्याने आता ते लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या देखील तयारीत असतील. जनहित विचारधारेपेक्षा त्यांना स्वतःची खुर्ची जास्त प्रिय आहे असा टोला लगावला. आज सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात अवैध मायनिंग माफियांचा मोठ्या प्रमाणात उच्छाद सुरू आहे. हा सर्व प्रकार केसरकरांच्याच आशीर्वादाने सुरू आहे का ? आडाळी एमआयडीसीमधील बेकायदा माती उत्खननात जनतेचे मोठे नुकसान झाले. दोडामार्ग तालुक्यातील अवैध धंद्यांकडे त्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याच दिसत आहे.क्वॉरीच्या ठिकाणी बेकायदा कृत्यांचा विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण झाली तरीही पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. जनता वाऱ्यावर, आमदार मात्र मुंबईत मज्जा मारण्यात मग्न आहेत. मतदारसंघातील जनता पाणी, आरोग्य, रस्ते आणि बेरोजगारीच्या समस्यांनी त्रस्त आहे. मात्र, आमदार मतदारसंघात लक्ष न देता मुंबईत ठाण मांडून बसलेत. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. तातडीने आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जेष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, बाळा धाऊसकर, रवींद्र म्हापसेकर, ऍड. समीर वंजारी,
तालुकाध्यक्ष सावंतवाडी अभय मालवणकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विधाता सावंत, दोडामार्ग तालुकाध्यक्ष गुणाजी गवस, अमिदि मेस्त्री, संजय लाड, मनोहर राऊळ, सुधीर मल्हार, प्रणाली नाईक, सुमेधा सावंत, बाळा नमशी, आनंद आईर मोहसीन मुल्ला,आफताब हेरेकर, पीटर फर्नांडिस, संतोष तावडे, सुभाष नाईक, संतोष जो व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page