छप्पर हरवलेल्या माऊलीला विशाल परब यांचा मदतीचा हात…

⚡बांदा, ता.२-: डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला गंभीर आजार आणि तोंडावर आलेला पावसाळा… अशा अत्यंत विदारक परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील वृद्ध विधवा माता आणि तिचा आजारी मुलगा जीवन जगत आहेत. या हतबल कुटुंबाच्या मदतीला भाजप युवा नेते विशाल परब धावून आल्याने या कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
इन्सुली पागावाडी येथील श्रीमती जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या आपल्या मुलासह अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी घराचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे “यंदाचा पावसाळा कसा काढायचा?” या भीतीने जनाबाई पाटील यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
जनाबाई यांचा मुलगा शाहू धोंडू पाटील हा गंभीर क्षयरोगाने (टीबी) आजारी असून तोच घराचा एकमेव आधार आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने उपचारांसाठीही पैसे नसल्याने हे कुटुंब पूर्णपणे खचून गेले होते.
दरम्यान, या कुटुंबाची परिस्थिती इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती भाजप युवा नेते विशाल परब यांना दिली. परिस्थितीची माहिती मिळताच विशाल परब यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेत या कुटुंबाला आधार दिला.
याबाबत बोलताना विशाल परब म्हणाले, “या कुटुंबाची अवस्था पाहून मन सुन्न झाले. पावसाळ्यात एका वृद्ध माऊलीला आणि आजारी मुलाला अशा अवस्थेत सोडणे माणुसकीला धरून नाही. या कुटुंबाला सुरक्षित निवारा आणि आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
विशाल परब यांनी प्रत्यक्ष मदतीचा हात दिल्याने परिसरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. “गरिबांचा खरा आधार” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत असून, त्यांच्या या मदतीमुळे जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला नव्याने जगण्याची आशा मिळाली आहे.

You cannot copy content of this page