आंबा बागायतदारांच्या नाराजीचा उद्रेक; पंचायत समिती सभेत सभापती गणेश राणे यांचा कृषी विभागाला जाब..
⚡देवगड ता.०१-:
देवगड तालुक्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना पीक विमा सर्वेक्षण करताना बापर्डे मंडळाला वारंवार वगळले जात असल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांनी कृषी विभागावर केला. पीक विम्याच्या हवामान केंद्राच्या उभारणीपासून ते नुकसान सर्वेक्षणापर्यंत बापर्डे मंडळाला डावलण्याचे प्रकार का घडतात, असा थेट सवाल त्यांनी कृषी अधिकारी पाटील यांना पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित केला.
देवगड पंचायत समितीची मासिक सभा सभापती गणेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपसभापती अमोल लोके, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सर्व सदस्य, खातेप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
सभापती राणे म्हणाले की, देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांचे बँकांमार्फत पीक विम्याचे हप्ते नियमित भरले जातात. मात्र चुकीचे निकष आणि अपुऱ्या सर्वेक्षणामुळे अनेक पात्र बागायतदारांना विम्याचा लाभ मिळत नाही. मागील रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित ठिकाणी काही कर्मचारी काम करत होते; मात्र ते नेमके कोणते काम करत आहेत याची माहिती स्थानिकांना नव्हती. हवामान केंद्र पंचक्रोशीच्या मध्यवर्ती भागात असावे असा नियम असताना प्रत्यक्षात तसे होत नसल्याने बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी इशारा देत सांगितले की, आंबा बागायतदारांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड असंतोष असून परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे कृषी विभागाने याबाबत तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन योग्य कार्यवाही करावी.
दरम्यान, सिंधुरत्न योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पुढील पंधरा दिवसांत सर्व विभागांनी लेखी स्वरूपात सादर करावी, अशी सूचना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केली. घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या ३२ कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच ग्रामपंचायतीमार्फत अधिकृत परवानगी दिली जाईल. अन्यथा ती बांधकामे अनधिकृत म्हणून नोंदवली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात २६ नवीन विंधन विहिरींची कामे मंजूर असून ज्या ठिकाणी जागेचा प्रश्न सुटला आहे ती कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. उर्वरित ठिकाणचे अडथळे दूर करून ती कामेही मार्गी लावली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
आचारसंहिता लागू असल्यामुळे या सभेत कोणतेही धोरणात्मक निर्णय किंवा ठराव घेण्यात येणार नसून केवळ विभागीय आढावा व चर्चा होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नारिंग्रे येथील शाळेचे छप्पर कोसळण्याच्या अवस्थेत असून मे महिन्याच्या सुट्टीतही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले नसल्याचा मुद्दा सदस्य ओगले यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे का, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. यावर गटविकास अधिकारी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ न देता शाळेच्या छप्पराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या आपत्ती कक्षाच्या धर्तीवर ग्रामपंचायत स्तरावरही आपत्ती कक्ष स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कक्षात पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग राहणार आहे.
तसेच ४ जून रोजी स्वच्छ भारत मिशन, ५ जून रोजी वृक्षारोपण आणि ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ हे उपक्रम पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी केले.
टंचाई आराखड्यातील कामांना मंजुरी मिळाली असून उर्वरित कामांचे प्रस्ताव डिसेंबरपूर्वी सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले. सदस्यांच्या मागणीनुसार पंचायत समिती सभागृहाचे सुशोभीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोयरे येथे गोशाळा सुरू करण्यासाठी स्थानिक मंडळी इच्छुक असल्याचे सदस्य ओगले यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्याबाबत आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सूर्यवंशी यांनी तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांबाबत माहिती देताना नळयोजना दुरुस्तीची १७ कामे मंजूर असल्याचे सांगितले. तसेच बोअरवेल दुरुस्तीची ४ कामे, २६ नवीन विंधन विहिरींची कामे आणि गाळ काढणे व विहीर दुरुस्तीची २ कामे मंजूर झाल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
सभेच्या शेवटी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या खात्यांतील कामांचा आढावा सादर केला. सदस्य तळवडेकर यांनी मान्सूनपूर्व तयारीअंतर्गत तळवडे मतदारसंघातील विविध विभागांची किती कामे पूर्ण झाली आहेत याची माहिती मागितली. त्यावर भूमी अभिलेख विभागाचे क्षीरसागर यांनी विभागासमोरील अडचणी व सुरू असलेल्या कामांची माहिती सभागृहासमोर मांडली.
