प.पू. परमात्मराज महाराज: बांदा येथे आयोजित प्रवचन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..
⚡बांदा ता.०१-: अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक त्रुटी दूर करून, मनाची शुद्धी करून जीवनाचा प्रवास अधिक सुकर आणि मोक्षमार्गाकडे नेण्यासाठीचा एक ‘आध्यात्मिक सर्व्हिसिंगचा काळ’ आहे. त्याचप्रमाणे अधिक मास हा मानवी जीवनातील आध्यात्मिक दृष्ट्या असलेल्या दोषांचे अवलोकन करून ते दूर करण्यासाठीचा काळ आहे. हा एक प्रकारे ‘आध्यात्मिक शिबिर’ (कॅम्प) कालावधी आहे, असे प्रतिपादन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने ‘अधिक मास पौर्णिमे निमित्त’ आयोजित केलेल्या प्रवचनकार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी श्री दत्तगुरु चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले; ज्याप्रमाणे एखादी वस्तू बिघडल्यावर आपण ती दुरुस्त करतो, तसेच आध्यात्मिक क्षेत्रात आपल्याकडून झालेल्या दोषांचे निवारण करणे म्हणजे ‘सन्निशोधन’ होय. चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांच्यातील समतोल राखण्यासाठी ‘अधिक मासाची’ योजना करण्यात आली आहे.
अधिक मासात विवाह, वास्तुशांती यांसारखी मोठी सामाजिक किंवा धार्मिक कार्ये नसतात, त्यामुळे माणसाला स्वतःसाठी अधिक वेळ मिळतो. या वेळेचा उपयोग आपल्या मनातील विचार शोधण्यासाठी, आध्यात्मिक विचारांचे चिंतन करण्यासाठी आणि वाईट विचार दूर करून अंतर्मनाची दुरुस्ती’ करण्यासाठी केला जातो. केवळ मूर्तीमध्ये देव न पाहता माणसामध्ये देव पाहणे आणि आपल्या स्वभावातील स्वार्थीपणा दूर करणे ही खरी दुरुस्ती आहे. विज्ञानाचे शोध कधीकधी पर्यावरणास हानीकारक ठरू शकतात, परंतु अध्यात्म हा मानवी जीवनाचा मूळ आधार आहे. जो खरी उन्नती घडवून आणतो. केवळ बाह्य उपचार न करता, या काळात स्वतःच्या अंतर्मनाचे चिंतन करून स्वभावात बदल करणे आणि माणसात देव पाहण्याची वृत्ती विकसित करणे, हीच या काळातील खरी आध्यात्मिक सुधारणा आहे.
सध्या जगात शांतीचा अभाव आहे. कारण माणसाचा स्वभाव स्वार्थी झाला आहे .”माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल” हा मानवी स्वभावातील मोठा दोष आहे. हा भेदभावाचा दोष दूर करण्यासाठी आणि “सर्वांचे चांगले व्हावे” ही भावना विकसित करण्यासाठी धार्मिक वाङ्मयाचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा वाचनामुळे माणसाच्या चित्ताची, बुद्धीची, स्वभावाची आणि पर्यायाने संपूर्ण आयुष्याची दुरुस्ती होते .यातूनच माणसावर सुसंस्कार होतात आणि आध्यात्मिक ‘सन्निशोधन’ अर्थात दुरुस्ती शक्य होते. केवळ धार्मिक ग्रंथ वाचणे पुरेसे नाही, तर त्याचा ‘यथा योग्य अर्थ’समजून घेणे, आध्यात्मिक प्रगतीसाठी अनिवार्य आहे. अध्यात्म हे आत्मस्वरूपाचे शास्त्र’ असून ते विज्ञानापेक्षा श्रेष्ठ आणि मानवी जीवनाचा मूळ आधार’आहे.
विज्ञानाचा उपयोग करून घेताना आपली ‘अध्यात्मनिष्ठा’ ढळू देऊ नये. खरी जीवनातील ‘दुरुस्ती’ ही अध्यात्माचा आधार घेतल्यावरच शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
या दुर्मिळ योगाचे महत्त्व ओळखूनच आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात विशेष रीतीने श्री दत्तयागसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . या काळात ‘दत्त याग’ किंवा तत्सम धार्मिक विधी करणे अधिक फलदायी ठरते. ज्योतिषशास्त्रातील गूढ अवघड बाबी सर्वसामान्य माणसाला कदाचित समजणार नाहीत, परंतु हा एक अत्यंत दुर्मिळ पर्वकाळ असून दि 14 जून व 15 जून रोजी होणाऱ्या दत याग सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी महादेव वाळके, सदाशिव वाळके, सुशांत पाटील, प्रसाद चव्हाण यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी उदय वाशीकर, श्वेता वाशीकर, शशिकांत पाटील, सुरेखा पाटील, रंगराव पाटील, डॉ. अक्षय शिवछंद, कीर्ती पाटील, प्रसन्नकुमार गुजर, अजित पाटील, प्रियांका वाणी, बंडा कदम आदि मान्यवरांचा तसेच देणगीदारांचा परमपूज्य परमात्मराज महाराज व देविदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आडी, निपाणी, कागल, कोल्हापूर, बेळगांव, बेंगलोर, पुणे, मुंबई, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, गोवा राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
फोटो:-
आडी येथे प्रवचनसाठी उपस्थित असलेले भाविक.
फोटो:-
प पू परमात्मराज महाराज.
