पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांचा संतप्त इशारा..
⚡देवगड ता.०१-:
देवगड तालुक्यातील इळये-भास्करवाडी आणि इळये-चिखलवाडी येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरणाचे काम जिल्हा वार्षिक योजनेच्या जनसुविधा निधीतून मंजूर झाले असूनही, प्रशासनाच्या आणि बाह्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे खऱ्या गरजू भागाचे काम रखडल्याचा गंभीर आरोप पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले यांनी केला आहे.
लोकांच्या मागणीनुसार अपघाती प्रवण क्षेत्र असलेला घाटरस्ता प्राधान्याने न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
देवगड तालुक्यातील ‘इळये भास्करवाडी-चिखलवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण’ आणि ‘इळये चिखलवाडी रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण’ ही दोन महत्त्वाची कामे जनसुविधा अंतर्गत मंजूर करण्यात आली होती. संबंधित रस्त्यावर सुमारे १३५ ते १४० मीटर लांबीचा तीव्र घाटाचा भाग आहे. या ठिकाणी गेल्या दोन वर्षांत अनेक अपघात झाले असून, काही शासकीय अधिकारीही येथे पडून जखमी झाले आहेत. त्यामुळे या घाटाचे काम आधी व्हावे, अशी स्थानिक नागरिकांची तीव्र मागणी होती.
निवडणुकांच्या काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत काही बाह्य शक्तींनी आणि प्रशासनाने संगनमत करून चुकीच्या पद्धतीने इस्टिमेट (अंदाजपत्रक) तयार केल्याचा आरोप होत आहे. घाटाचे अवघड काम टाळून, जेथे रस्ता सपाट आणि सोपा आहे तिथेच काम करण्याचा घाट घातला गेला आहे. हे काम कंत्राटदाराच्या फायद्यासाठी केले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
”माझ्याच पत्राची दखल घेऊन सन्माननीय पालकमंत्र्यांनी ही कामे मंजूर केली होती. मात्र, प्रशासनाने लोकांच्या सुरक्षिततेची दखल न घेता कंत्राटदाराच्या हिताचे काम सुरू केले आहे. हा भास्करवाडीतील जनतेवर झालेला अन्याय आहे.”, असे सदाशिव ओगले यांनी सांगितले.
सध्या हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने अद्यापही वेळ न घालवता स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करावा आणि तो १३५ ते १४० मीटरचा मुख्य घाटाचा भाग तातपिडीने दुरुस्त करून प्रश्न सोडवावा. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर या अन्यायाविरोधात टोकाचे पाऊल उचलून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा यावेळी देण्यात आला आहे.
