⚡सावंतवाडी ता.३१-: येथील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दांपत्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गिर्यारोहक जोडप्याने प्रतिकूल हवामानावर मात करत हे खडतर आव्हान पूर्ण केले. यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
त्यांच्या या साहसी कामगिरीचे संपूर्ण कोकणात व महाराष्ट्रात कौतुक होत आहे. हा विक्रम केल्यानंतर आज हे दाम्पत्य सावंतवाडीत आपल्या घरी परतले. यावेळी त्यांच्या कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. फटाके फोडून, मिठाई भरवत मित्रपरिवाराकडून मोठा जल्लोष करण्यात आला. माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. कुटुंबाची साथ होती त्यामुळे ही अवघड गोष्ट साध्य करू शकलो. आमच्यामुळे सावंतवाडीच्या नावलौकिकात भर पडत असलेल पाहून आनंद होतो अशी भावना अक्षय मठकर यांनी व्यक्त केली. तर यासाठी आम्ही सहा महिने तयारी करत होतो. काही आव्हानं समोर होती. पण, आव्हान पूर्ण करण्याचा पण केला होता. छत्रपती शिवाजी महाराज पाठीशी होते. त्यामुळे हे साध्य करू शकलो. माहेर आणि सासरकडून मिळालेला पाठिंबा प्रेरणादायी असल्याची भावना सौ. नुपूर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी बाळकृष्ण मठकर, भारती मठकर,अनिल चोडणकर, शर्वरी चोडणकर,संजय मठकर,श्रावणी मठकर,अदित मठकर,दुर्वा मठकर,श्रीया मठकर, आबा पिंगुळकर, मीना पिंगुळकर,ऐश्वर्या पिंगुळकर,उमेश पिंगुळकर,ज्योती कारेकर,साईप्रसाद मालवणकर,सावी मालवणकर,श्रीजा मालवणकर,प्रशांत मठकर,प्रिया मठकर,सुनील शिरोडकर,पूजा शिरोडकर,अचल माणगावकर,डॉ. अनिश स्वार, कुणाल खोत,पावन चोडणकर, सूरज नाटेकर,प्रतीक चोडणकर,संकल्प तेंडोलकर,मिहिर मठकर आदी उपस्थित होते.
