४ जून रोजी ‘मैदान स्वच्छता मोहीम’:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार..
⚡कुडाळ ता.३१-: शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारील शासकीय क्रीडा मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले असल्याच्या तक्रारी येत आहेत. क्रीडाप्रेमी आणि सुजाण नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने या मैदानावर ४ जून रोजी सकाळी साडेसात वाजता भव्य ‘स्वच्छता मोहीम’ राबवण्यात येणार आहे.
हल्लीच स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, या शासकीय क्रीडा मैदानाची दुरवस्था झाली असून तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. यामुळे खेळाडू आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ‘मैदानावर नशा’ आणि ‘तळीरामांचा अड्डा’ अशी या क्रीडा मैदानाची दुरवस्थेची ओळख निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि खेळाडूंना त्यांचे मैदान पुन्हा सुरक्षित व स्वच्छ स्वरूपात मिळवून देण्यासाठी शिवसेनेने हे पाऊल उचलले आहे.
कुडाळ शहरातील सर्व सुजाण नागरिक, क्रीडाप्रेमी, तरुण आणि महिलांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आपल्या शहराचे वैभव असलेले हे मैदान स्वच्छ आणि सुंदर ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे या श्रमदानात सर्वांनी आपले योगदान द्यावे,” असे आवाहन शिवसेना व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने करण्यात आले आहे.
