विलवडेतील कथित बेकायदा काळ्या दगड उत्खननावर तहसीलदारांचे कारवाईचे आदेश…

⚡बांदा ता.२९-: विलवडे येथे सुरू असलेल्या कथित बेकायदा काळ्या दगड (क्वारी) उत्खनन व वाहतूक प्रकरणी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी बांदा महसूल मंडळ अधिकारी यांना तात्काळ कारवाईचे लेखी आदेश दिले आहेत. यासंदर्भात तहसीलदार सावंतवाडी यांनी मंडळ अधिकारी बांदा यांना पत्र पाठवून उत्खनन त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, विलवडे येथे मोठ्या प्रमाणात बेकायदा काळ्या दगडाचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची तक्रार तहसीलदार कार्यालयाला प्राप्त झाली होती. मात्र संबंधित ठिकाणी आवश्यक परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महसूल क्षेत्रातून रस्ता वापर करण्यात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्या पत्राचा संदर्भ घेत तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, बेकायदा उत्खननामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधित ठिकाणी सुरू असलेले उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page