संघर्षावर मात करत समाजसेवेचा वसा जपणारे विक्रांत सावंत…

⚡सावंतवाडी ता.२८-:
समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवत हजारो कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जिल्हा परिषद सदस्य तथा सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. माजी आरोग्यमंत्री स्व. भाईसाहेब सावंत आणि शिक्षणमहर्षी स्व. विकासभाई सावंत यांच्या विचारांचा आणि कार्याचा समृद्ध वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांनी अल्पावधीतच स्वतःचे स्वतंत्र नेतृत्व निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्लोबल महाराष्ट्र चैनल कडून घेण्यात आला धावता आढावा.

जीवनात अनेक संकटांचा सामना करत त्यांनी संघर्षातून स्वतःला सिद्ध केले. कौटुंबिक आयुष्यात मोठा आघात सहन करतानाही त्यांनी खंबीरपणे उभे राहत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले. दोन चिमुकल्यांची जबाबदारी सांभाळत त्यांनी “भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान”च्या माध्यमातून लोकसेवेचे कार्य अधिक व्यापक केले.सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी सिंधुदुर्गातील मराठा क्रांती मोर्चाला मोठे स्वरूप देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पारंपरिक काँग्रेसचा वारसा असतानाही त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत संघटन कौशल्याच्या जोरावर माजगावसह अनेक ग्रामपंचायतींवर भगवा फडकवला. त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत त्यांच्यावर विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
नंतरच्या काळात राज्याचे मंत्री नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी माजगाव मतदारसंघात विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला. जनसंपर्क, लोकांशी थेट संवाद आणि गावागावांत केलेले काम यामुळे त्यांना मोठा जनाधार मिळाला.
सध्या ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण व कृषी समितीवर कार्यरत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. वडील स्व. विकासभाई सावंत यांच्या निधनानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांच्यावर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या “शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी”च्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
मुंबई विद्यापीठातून MBA शिक्षण घेतलेल्या विक्रांत सावंत यांनी शिक्षण क्षेत्रातही आधुनिक दृष्टीकोन आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि माजगाव परिसरात शिष्यवृत्ती सराव परीक्षांसारखे उपक्रम सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
जनसामान्यांच्या सुख-दुःखाशी एकरूप होऊन कार्य करणारा अभ्यासू, कर्तृत्ववान आणि दूरदृष्टी असलेला युवा नेता म्हणून विक्रांत सावंत यांच्याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आशेने पाहत आहे. समाजसेवेचा नंदादीप अखंड तेवत ठेवणाऱ्या या युवा नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page