वेंगुर्ला मठ सावंतवाडी मार्गांवर झाडांच्या फ़ांद्या तुटून रस्त्यावर..
⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मार्गांवर वेंगुर्ला भटवाडी एरिया, मठ मोबारकर स्टॉप नजिक, टाकयेवाडी, मठकरवाडी तसेच आडेली खुटवळवाडी आदी ठिकाणी मुख्य मार्गांवर झाडाच्या फ़ांद्या तुटून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी स्ट्रीटलाईटवर फ़ांद्या तुटून पडल्याने काही ठिकाणी तारा मुख्य रस्त्यावर लोम्बकळत आहेत. मठ एरियात शासनाच्या दोन्ही विभागामार्फत वेळीच काम पूर्ण न केल्याने शुक्रवारी वाहनधारकांना मोठ्या समस्याचा सामना करावा लागला. मठ ग्रामपंचायतमार्फत मठ ग्रामपंचायत नजिक तसेच ठाकूरवाडी एरियात दरवर्षी दुर्लक्ष केले जात असल्याने दूषित पाणी मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने वाहनधारकांना धोका संभवत आहे. “मठ ठाकुरवाडी येथील वळणावर अगदी साईडपट्टीवर दगड थप्पीने ठेवले असल्याने अपघात झाल्यास गंभीर स्थिती उद्भवू शकते”. याठिकाणी ग्रामपंचायत मार्फत वेळीच लक्ष न पूरविल्यास सुसाट वाहनधारकांना धोका संभवत आहे. मुख्य मार्ग असूनही सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत व विद्युत वितरण मार्फत झाडी कटिंगची कोणतीच अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. नुकताच मठ श्री बादेश्वर मंदिर नजिक सकाळीच एका वाहनाने रस्ता सोडत विद्युत पोल वाकवीला होता. सुदैवाने यातील चारजण सुदैवाने बचावले होते. आज झालेल्या वादळी वाऱ्याने पीडब्लूडी व एमईसीबी दोन्ही विभागाचे पितळ उघडे पडले आहे. सभापती शंकर घारे यांनी सूचना देऊनही संबंधित ठेकेदार टाकयेवाडी येथील काम पूर्ण करण्यास कोणता मुहूर्त शोधतोय, असा सवाल वाहनधारकांतून करण्यात आला आहे. आज झालेल्या पावसामुळे वेंगुर्ला सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांनी त्वरित पुन्हा पाहणी करून त्वरित अंमलबजावणी व्हावी व पावसाळा कालावधीत अपघात होऊ नये, यासाठी संबंधित विभागाना सूचना द्याव्यात, अशी मागणी वाहनधारक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.दरम्यान शहरासह ग्रामीण भागात विजपुरवठा खंडित झाला होता.
