शरीरस्वास्थ्याबरोबर सर्वोतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा…

डॉ. प्रदीप पाटकर:बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत डॉ. पाटकर यांचे व्याख्यान..

⚡कुडाळ ता.०५-: शरीर स्वास्थ्याबरोबर सर्वतोपरी संतुलित राहणे म्हणजे निरोगीपणा होय. मानसिक ताणतणावापासूनची मुक्ती जीवनात आपणास आनंदी बनवते; यासाठी स्वजागृती महत्त्वाची आहे आणि स्वजागृती ही विविध संदर्भातील साधारण ज्ञानातून येते. त्यासाठी मानसिक ताणतणाविषयीचे ज्ञान प्राप्त करा. असे आवाहन मुंबई येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांनी केले.
मानसिक ताण तणाव या संदर्भात भावी नर्सेस व भावी फिजीओथेरपी डॉक्टर यांच्याशी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये संवाद साधताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांचा सौंभाग्यवती डॉ. सौ. पाटकर , राजीव गोरे, सौ रोहिणी गोरे , बॅ नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गळवणकर, अमृता गाळवणकर, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या कल्पना भंडारी, वैशाली ओटवणेकर, प्रथमेश हरमलकर ई. उपस्थित होते.
डॉ. प्रदीप पाटकर यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये निरामय, आरोग्यपूर्ण जीवनासाठी ज्ञानेश्वरीचा दाखला देत रोगरहीत स्थिती, आनंद प्राप्ती; त्यातून स्व कल्याणाबरोबर जनकल्याण कसे साधता येते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पाटकर म्हणाले, जीवनामध्ये सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असे नाही. अशावेळी तडजोड व संयम महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. त्याचा शोध व वेध घेतल्यास बऱ्याच अंशी गैरसमज दूर होऊन ताणतणापासून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होते. यासाठी अप्रिय गोष्टी, प्रतिकूल गोष्टी खेळकरपणाने स्वीकारता आल्या पाहिजेत. वैद्यकीय शास्त्र हे उपयोगाच शास्त्र आहे, त्याचा योग्य उपयोग करा असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय पेशांमध्ये असणाऱ्या विविध समस्या व त्यावर कशा पद्धतीने मात करता येईल, या संदर्भात देखील त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
डॉ. सौ. पाटकर म्हणाल्या, मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधण्याच्या गरजेचे आहे. त्यांनी काही योगा, ध्यान धारणाबबतची प्रात्यक्षिके करून दाखवली. निरोगी मन व शरीरासाठी प्रत्येकाने आपल्यातील छंद जोपासावे त्यातून मानसिक संतुलन राखण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, याचा आवर्जून उल्लेख करत मनोरंजनात्मक गोष्टीत सुद्धा आपलं मन गुंतवल्यास तणाव रहित जीवन जगता येतं, हे सांगून सर्वांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. राजीव गोरे यांनी सुद्धा दैनंदिन कामकाज करताना ताण-तणाव विरहीत राहण्यासाठी नेहमीच्या कामांमध्ये वेगळेपण, नवनवीनतेचा अनुभव घेत असताना तणावमुक्त राहता येते हे सोदाहरण स्पष्ट केले.
महाराष्ट्र स्टेट्स कंट्रोलिंग सोसायटीच्या उपसंचालिका सौ. रोहिणी गोरे यांनीही उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक यांना संबोधित करताना ‘अध्यापनाच्या नवीन पद्धतीचा आधार घेतल्यास व आपल्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून दिल्यास त्यांच्यातील न्यूनगंड कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीर, मनाची प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे, हे सांगत प्रसन्न मन चैतन्यमय शरीराची शिदोरी असल्याचे सांगितले. त्यासाठी मन आणि शरीर यांचा योग्य पद्धतीने सांभाळ करा. असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मयेकर यांनी केले.

You cannot copy content of this page