पुढील दोन महिने मुलांना मोफत पुस्तक वाचनाची संधी ; वाचन संस्कृती जोपासण्याचा संस्थेचा संकल्प…
⚡मालवण ता.०३-:
मालवण येथील प्रसिद्ध ‘श्री शिवाजी वाचन मंदिर’ संस्थेच्या वतीने गेली तीन वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘संस्कार वर्ग’ शिबिराची यंदाही अतिशय उत्साहात सांगता झाली. २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत संपन्न झालेल्या या शिबिरात मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरात केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर भर देण्यात आला. यात प्रामुख्याने शारीरिक सुदृढतामध्ये प्रार्थना, ओंकार साधना, सूर्यनमस्कार आणि योगासने. मूल्यशिक्षण व आचरणमध्ये बोधकथा, रोजचे आदर्श आचरण आणि खाद्यसंस्कृतीची माहिती. सभा धीटपणा वाढवणे आणि विविध खेळांचे आयोजन, आजच्या काळातील कळीचे मुद्दे जसे की ‘टीव्ही-मोबाईल’चा अतिवापर आणि ‘पुस्तकांचे महत्त्व’ यावर मुलांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिबिरात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मुलांना मोफत मार्गदर्शन केले. यामध्ये कमल बांदकर, प्रभुदास आजगांवकर, डॉ. स्वाती परब, राधा दिघे, श्रीधर काळे, रत्नाकर कोळंबकर, डॉ. सचिन दिघे, लीना नार्वेकर, मेधा शेवडे, चंद्रशेखर कोचरेकर, मानसी दुधवडकर आणि कु. साक्षी सावंत यांचा समावेश होता.
वाचनालयाच्या वतीने मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी एक स्तुत्य उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीच्या पुढील दोन महिन्यांत शिबिरातील मुलांना मोफत पुस्तके वाचायला दिली जाणार आहेत. केवळ पुस्तक वाचून न थांबता, त्यावर चर्चा करण्यासाठी मुलांनी आठवड्यातून एकदा एकत्र जमून संस्कार वर्गात शिकलेल्या गोष्टींचे आचरण करण्याचेही निश्चित केले आहे.
मुलांनी केवळ तंत्रज्ञानात न अडकता पुस्तकांच्या जगात रमावे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे असे संस्था पदाधिकारी यांनी सांगितले.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी सहभागी मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुभाष दिघे, विजय अटक आणि श्रीम. हेमा परुळेकर उपस्थित होते. उपस्थित मुलांचा उत्साह पाहून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. शेवटी सर्व मुलांना खाऊ वाटप करून या पाच दिवसांच्या ज्ञानयज्ञाची यशस्वी सांगता करण्यात आली.
