छ. संभाजी महाराजांचा इतिहास हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान : विशाल परब…

⚡वेंगुर्ला ता.०३-: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब आणि वेदिका परब यांच्या हस्ते
“इथे ओशाळला मृत्यू”
या नाटकाचे उद्घाटन वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाले.
त्याग आणि असीम बलिदानाचा रोमांच अंगावर उभा करणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत धगधगता इतिहास नवीन पिढीसमोर यावा यासाठी शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता “इथे ओशाळला मृत्यू” हे महान ऐतिहासिक नाटक वेंगुर्ला येथील नाट्यकर्मी मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. सदर नाटकाचे उद्घाटक म्हणून भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब आणि वेदिका परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.वेंगुर्ला नगराध्यकक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. मिलिंद काळे, डॉ. राजेश्वर उबाळे , डाॅ. सुरेखा काळे, ज्येष्ठ भाजपा नेते आणि वेंगुर्ला तालुक्यातील सामाजिक चळवळीचे मार्गदर्शक शरद चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, नगरसेविका गौरी माईणकर, रिया केरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो रसिक प्रेक्षकांनी या अजरामर ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा अंगावर रोमांच उभा करणारा अनुभव आज पुन्हा नव्याने घेतला. डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग वर्किंग कमिटी वेंगुर्ला आणि वेंगुर्ला मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात विविध सामाजिक कार्य सुरू आहे. वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आदी उपक्रम यावर्षी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास हे महाराष्ट्राच्या इतिहासातील असे सोनेरी पान आहे, ज्याला रक्तरंजीत इतिहासाची दुर्दैवी झालर आहे. हा इतिहास विसरता येण्याजोगा नाही आणि विसरावा असा तर मुळीच नाही. हा इतिहास नव्या पिढीच्या रक्तात भिनला पाहिजे, असे भावपूर्ण उद्गार या नाट्यप्रयोगाच्या वेळी विशाल परब यांनी काढले. या नाट्यप्रयोगानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याप्रति हळव्या भावविश्वाच्या आणि कठोर बलिदानाच्या इतिहासाने पुन्हा एकदा भारावून गेल्याचे चित्र दिसून आले .

You cannot copy content of this page