दोडामार्गात ‘गो-सन्मान’साठी भव्य मोर्चा…

⚡दोडामार्ग,ता.२८-:
“चलो दोडामार्ग…” या घोषणांनी तालुका दणाणून सोडत सोमवारी गो-सन्मान अभियानांतर्गत भव्य मोर्चा उत्साहात काढण्यात आला. पिंपळेश्वर बाजारपेठेतून निघालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना सविस्तर निवेदन सादर केले. मोर्चात मोठ्या संख्येने गोप्रेमी, नागरिक तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गो-सन्मानासाठी ठाम भूमिका
या आंदोलनातून केंद्र सरकारपर्यंत ठोस संदेश पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. देशभर एकाच वेळी तालुकास्तरावर निवेदने देण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून दोडामार्गातही ही लढाई उभी राहिली. “गोमातेचा सन्मान हा केवळ भावनेचा विषय नसून राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे,” असा जोरदार सूर आंदोलनकर्त्यांनी लावला.
मुख्य मागण्या
सादर करण्यात आलेल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या—
गोमातेला “राष्ट्रमाता” म्हणून घोषित करणे
गोसेवेसाठी देशभर एकसमान केंद्रीय कायदा लागू करणे
भारतात गोहत्या पूर्णतः बंद करणे
शासनासमोर १० ठोस उपाययोजना
घोषणांपुरते मर्यादित न राहता तातडीने अंमलबजावणी व्हावी, यासाठी विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या—
गोशाळांना नियमित अनुदान व व्यवस्थापनासाठी धोरण
गोमूत्र व शेणावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन
शेतकऱ्यांना आर्थिक मदत व गोआधारित शेतीला चालना
रासायनिक शेतीवर नियंत्रण, सेंद्रिय पर्यायांना प्राधान्य
गोवंश संवर्धनासाठी संशोधन केंद्रांची स्थापना
दुग्धव्यवसाय व गोपालनाला बाजारपेठीय पाठबळ
सार्वजनिक कार्यक्रमांत गोदुग्ध व संबंधित उत्पादनांचा वापर वाढवणे
चारागाह जमीन व गोचर भूमीचे संरक्षण
गोवंशाशी संबंधित उद्योगांना विशेष सवलती
बैलाधारित शेतीसाठी विशेष आर्थिक मदत
मोठ्या संख्येने सहभाग
मोर्चात तरुण, शेतकरी, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

You cannot copy content of this page